सियोल : तंत्रज्ञानाच्या बाबतीत कैक मैल पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाने नाही तर दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5 जी लाँच करण्यात आले.
दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. मात्र, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. 4जीच्या तुलनेत 5जी 20 पटींनी वेगवान असणार आहे.
सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस10 5जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5जीची सेवा सुरु करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 2 हजार डॉलर आहे.
हे देश होते स्पर्धेत5जी सेवा सर्वप्रथम सुरु करण्यासाठी चीन, अमेरिका आणि द. कोरियामध्ये स्पर्धा सुरु होती. अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5 जी सेवा सुरु करणार आहे. तर चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप ट्रायल सुरु आहे. द. कोरियाने 5जी सेवेच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. एसके टेलिकॉमला 2019च्या शेवटी 10 लाखांहून अधिक ग्राहक जोडले जाण्याची आशा आहे. त्यांच्याकडे सध्या 4जीसाठी 2.7 कोटी ग्राहक आहेत. तर केटी कॉर्प 4जी पेक्षा स्वस्त प्लान देणार आहे.