सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर मेटाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांनी भारत आणि ब्राझीलमधील युजर्सना टार्गेट करणारी २३,००० हून अधिक फेक अकाऊंटंस आणि पेज काढून टाकली आहेत.
या स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी लोकप्रिय युट्यूबर्स, क्रिकेटपटू आणि व्यावसायिक व्यक्तींचं फेक व्हिडीओ (डीपफेक) तयार केले. या व्हिडिओंमध्ये असं दिसून आलं की, जणू काही हे लोक काही गुंतवणूक एप्स आणि जुगार वेबसाइट्सचा प्रचार करत होते.
लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात
सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना 'लवकर पैसे कमवा' अशा ऑफर दाखवल्या जात होत्या. त्यानंतर त्यांना चॅटिंग अॅप्स (जसे की WhatsApp किंवा Telegram) वर जाऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला. पुढे त्यांना गुगल प्ले स्टोअरसारख्या दिसणाऱ्या फेक वेबसाइटवर पाठवण्यात यायचं आणि तेथून त्यांना जुगार किंवा फेक गुंतवणूक एप्स डाउनलोड करण्यास सांगितलं गेलं.
काय म्हणते मेटा?
मेटाने दिलेल्या माहितीनुसार, हे स्कॅम लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देऊन क्रिप्टोकरन्सी, शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटसारख्या फेक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करतात.
कंपनीने असंही म्हटलं आहे की 'फेसबुक मार्केटप्लेस' वर अनेक स्कॅमर एक्टिव्ह होते, जे स्वतःला खरे सेलर म्हणून दाखवून लोकांकडून एडव्हान्स पेमेंट मागत असत. एका ट्रिकमध्ये, स्कॅमर जाणूनबुजून एखाद्या गोष्टीसाठी जास्त पैसे पाठवतात आणि नंतर रिफंड मागतात. नंतर ते प्रत्यक्ष पेमेंट रद्द करतात आणि दोन्ही पैसे घेऊन पळून जातात.
मेटाने कोणती पावलं उचलली?
मेटाने सांगितलं की, ते आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर "सतर्कता वाढवत आहेत". जर एखादं अकाऊंट संशयास्पद वाटत असेल किंवा युजरने डिलिव्हरीशिवाय आधी पैसे मागितले तर युजरला एक इशारा दिला जाईल.
याशिवाय, कंपनी आता सेलिब्रिटींच्या नावाखाली चालणारे स्कॅम्स पकडण्यासाठी फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. ही ओळख प्रक्रिया ऑप्शनल आहे, म्हणजेच युजर स्वतःच्या इच्छेनुसार ती चालू करू शकतात.
सरकारसोबत मिळून सुरू आहे काम
ऑनलाइन सुरक्षितता आणि डिजिटल जागरूकता वाढविण्यासाठी मेटाने भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT), ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) आणि भारतीय सायबर गुन्हे केंद्र (I4C) सारख्या अनेक एजन्सींसोबत सहकार्याने काम करत असल्याचं सांगितलं. कंपनीने देशातील ७ राज्यांमध्ये पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना स्कॅमचा सामना करण्यासाठी ट्रेनिंग वर्कशॉप्स देखील आयोजित केले आहेत.