Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मागच्या लेखात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय म्हणजे थोडक्यात मानवी बुद्धिमतेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदममध्ये आणणे हे पाहिले. आता आपल्या बुद्धीला म्हणजे मानवी बुद्धीला प्रश्न पडला असेल मानवी बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय?
शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून आपल्या बुद्धीचे विश्लेषण केले आहे. प्रामुख्याने शिकणं (लर्निंग), तर्क करणं (रिझनिंग), प्रश्न सोडवणं (प्रॉब्लेम सॉल्विंग), संवेदना (परसेप्शन्स) आणि नेहमीच्या भाषेचा वापर करणे (नॅचरल लँग्वेज) यांचा अंतर्भाव होतो. हे सर्व करत असताना चार प्रमुख गोष्टी मेंदू करत असतो,
१. सेन्स : ज्ञानेन्द्रियमार्फत मिळालेले ज्ञान किंवा इनपुट : आपणास ठाऊक आहे आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्रिय आहेत ती म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ यांच्याकडून आपणास सभोवतालची माहिती मिळत असते.
२. थिंक : मूल्यमापन : मानवी मेंदू या मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन करतो.
३. कृती : मिळालेली ज्ञानेन्द्रियांकडून माहिती व केलेले मूल्यमापन यानुसार कृती केली जाते. जसे आपले हात किंवा पाय हे कृती करतात.
४. लर्न : आत्मसात करणे शिकणे आणि सुधारणे : आपण मिळालेली माहिती मूल्यमापन आणि कृती याच्यातून सतत शिकत राहतो व सुधारणा करतो.
सेन्स, थिंक, अॅक्ट या क्षमता एआय आधी देखील मशीनमध्ये होत्याच, पण लर्न म्हणजे शिकणे, आत्मसात करणे, सुधारणे ही क्षमता मात्र नव्हती. त्यामुळेच एआयच्या आधी मशिन्स फक्त सांगितलेल्या सूचना पाळत ठरलेली कामे करत, परंतु शिकणे व सुधारणा करणे किंवा निर्णय घेणे शक्य नव्हते. उदाहरणचं द्यायचं म्हटलं तर आपण गुगलला ज्यावेळी एखादा प्रश्न विचारायचो तेव्हा तो आपल्याला त्यासंबंधी असणाऱ्या वेबसाईट देत असे. मात्र जेमिनी किंवा चॅटजीपीटी हे आपल्याला त्या प्रश्नावर आधारित विश्लेषण करून देते.
माणूस हा उदाहरणातून अनुभवातून शिकतो आणि त्याचा मेंदू त्याच्या नकळतपणे त्यामागील सूत्र सूचनावली बनवीत असतो. आता हेच तत्त्व एआय या संकल्पनेत आहे आणि ज्याला अल्गोरिदम, असे देखील म्हटले जाते. आता आपण हे एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात, लहान मुलाला प्राणीविश्व शिकवायचे आहे, आता यासाठी आपण काय करू शकतो?
प्राण्यांचे फोटो दाखवा, चित्र काढू, आवाज, व्हिडिओ, प्रत्यक्ष प्राणी किंवा प्राणी संग्रहालयाला भेट इत्यादी. जर त्याने प्राणी ओळखल्यास बरोबर शाब्बासकी आणि जर त्याने प्राणी न ओळखल्यास किंवा चुकल्यास नवीन फोटो चांगल्या प्रतीचा विविध प्रकारचा इत्यादी. म्हणजे आधी प्रश्न मग सूत्र आणि त्यावरून उत्तर.
आपण लहानपणापासून शाळेत असेच शिकत आलो. वर्तुळाची त्रिज्या क्ष, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. यात सूत्र माहीत असणे पाठ असण्यावर सारा भर. आपला मेंदू आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता असा मार्ग कधीच वापरत नाही. आपला मार्ग असतो आधी प्रश्न-उत्तरांची जोडी त्यावरून सूत्र, पॅटर्न, विशिष्ट कल, नमुना किंवा विसंगती अपवाद शोधणे.
संशोधक म्हणतात, अब्जावधी वर्षांची मानवी बौद्धिक उत्क्रांती घडताना जी सभोवतालच्या विश्वाची अगणित अशी माहिती आपण मिळवली, साठवली आणि असे जेव्हा वारंवार घडले तेव्हा माहितीची विशिष्ट सूत्र पॅटर्न बनत गेले, ज्याला आपण ज्ञान म्हणतो. निसर्गाने कधी कधी अत्यंत कठीण प्रश्नांची उत्तरे खूप सोपी करून ठेवलेली संगणक आज्ञावली प्रोग्रॅम्स ही असतात. यामध्ये निरीक्षण, प्रतिकृती, प्रयोग यांचा आधार घेतलेला असतो. आजपर्यंत जुन्या ठोकळेबाज पद्धतीने म्हणजे प्रश्न सूत्र = उत्तरे अशा मार्गावरून निर्माण झाली. जी पारंपरिक संगणक आज्ञावली होय. एआय संशोधकांनी निसर्गाचे मानवी मेंदूच्या कार्याचे सूक्ष्म निरीक्षण केले व त्यावरून एआय संगणक आज्ञावली अल्गोरिदम जी प्रश्न + उत्तरे = सूत्र अशा नैसर्गिक पद्धतीने काम करते. थोडक्यात काय तर मनुष्य हा उदाहरणातूनच शिकतो आणि त्याचा मेंदू त्याच्या नकळतपणे त्यामागील सूत्रे, सूचनावली बनवीत असतो. हेच तत्त्व एआयमध्ये तंतोतंत वापरले जाते. यापुढील लेखात आपण एआय कसे काम करते, हे पाहूयात.
- शशिकांत शिंदे, सहायक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा