कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. एचएमडीने आपला नवीन स्मार्टफोन एचएमडी वाइब 5G भारतात लॉन्च केला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा, ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी आणि एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जे सहसा महागड्या फोनमध्ये पाहायला मिळतात.
एचएमडी वाइब 5G फोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ९०Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह बाजारात दाखल झाला आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनमधील स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड १५ वर चालतो आणि त्याला दोन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळतील.
या फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स आणि दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. शिवाय, या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी १० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
एचएमडी वाइब 5G स्मार्टफोनची किंमत ११ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला, परंतु सध्या तो ८ हजार ९९९ रुपयांच्या विशेष किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन एचएमडी इंडिया, निवडक ई-कॉम प्लॅटफॉर्म आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. एचएमडीचा हा नवा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए०६ 5G शी स्पर्धा करेल. सॅमसंग गॅलेक्सी ए०६ 5G मध्ये ग्राहकांना ६.७ इंच एचडी+ डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा ड्युअअ कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएच बॅटरी मिळते. हा फोन फ्लिपकार्टवर अवघ्या९ हजार ५९९ रुपयांत उपलब्ध आहे.