फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेज सेलचा खूप मोठा घोटाळा समोर आला आहे. कमी किंमतीत अॅपल आयफोनसारखे फोन दाखवून ग्राहकांनी ऑर्डर दिल्यावर ते धडाधड रद्द करण्यात आले आहेत. या ग्राहकांनी सोशल मीडियावर एकच कल्ला केला असून Big Billion Scam असे नाव दिले आहे.
Apple iPhone 16 आणि iPhone 16 Pro बाबत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडला आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२५ सेलमध्ये अनेक प्रीमियम आणि हाय-एंड स्मार्टफोन्सवर, विशेषतः Apple iPhone 16 आणि iPhone 16 Pro वर भल्या मोठ्या डिस्काऊंटच्या जाहिराती करण्यात आल्या. यामुळे ग्राहकांनी ही डील मिळविण्यासाठी पैसे तयार ठेवले, जेव्हा हा डिस्काऊंट सुरु झाले तेव्हा त्यांनी ऑर्डरही केली.
बिग बिलियन डे २०२५ सेल दरम्यान आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो हे मॉडेल खूपच कमी किमतीत विकले जातील अशी जाहिरात करण्यात आली होती, हे सर्व काही अधिक विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जुन्या स्टॉकची क्लिअरन्स करण्यासाठी करण्यात आले होते. आयफोन १६ १२८ जीबी व्हेरिएंट ५१,९९९ रुपयांना विकण्याची जाहिरात करण्यात आली होती, तर आयफोन १६ प्रो त्याच्या बेस १२८ जीबी ट्रिममध्ये ७५,९९९ रुपयांना विकण्याची जाहिरात करण्यात आली होती. फ्लिपकार्ट ब्लॅक आणि प्लस सदस्यांसाठी २२ सप्टेंबरपासून हा सेल सुरु झाला होता.
ऑर्डर बुक झाल्यानंतर काही तासांतच फ्लिपकार्टने ऑर्डर कॅन्सल केल्याची नोटीफिकेशन पाठविली. ग्राहकांकडे पैशांचा व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे दिसत होते, परंतू नंतर पेमेट फेल झाल्याचे फ्लिपकार्टकडून नोटीफिकेशनमध्ये कळविण्यात आले. यामुळे अनेकांनी फ्लिपकार्टच्या या बिग बिलियन डेज सेलची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे.