एकोणीसशे नव्वदच्या दशकात खऱ्या अर्थाने डेस्कटॉप कॉम्प्युटरने कासवाच्या पावलांनी भारतात शिरकाव केला. त्यानंतर २००० च्या दशकात हा संगणक कामकाजाचा अविभाज्य भाग बनला. मात्र, २०१० नंतर आपला डेस्कटॉप संगणक आंकुचन पावला आणि त्याचे रूपडे लॅपटॉपचे झाले. अनेकांना मग डेस्कटॉप हा अडचण वाटू लागला. प्रवासात काम करणे सुलभ वाटू लागल्यामुळे लॅपटॉपच सोयीचा झाला. जर डेस्कटॉपचा लॅपटॉप होऊ शकतो तर लॅपटॉपचा आकारही आणखी छोटा होऊ शकतो, असा विचार अभियंत्यांच्या मनात आला आणि त्यांनी मग त्यातून टॅब्लेट कॉम्प्युटर विकसित केले. त्याचदरम्यान क्वार्टी की-पॅड (फोनवरच वेगळा की-बोर्ड असलेला मोबाईल फोन) याने कात टाकली आणि स्मार्ट फोन बाजारात आला. मग तंत्रज्ञांच्या मनात विचार आला की, या स्मार्ट फोनलाच आणखी ताकद देत यालाच संगणकाची शक्ती दिली तर ? ...आणि मग यातून जन्म झाला तो फॅब्लेटचा. फॅब्लेट म्हणजे फोन आणि टॅब्लेट यांचे मिश्रण. कदाचित फॅब्लेटचा पुढचा आविष्कारही लवकरच येईल. पण सध्या काळाचे एक चक्र पूर्ण झाले आहे आणि १९९० च्या दशकातील डेस्कटॉपची मागणी पुन्हा वाढत आहे.
डेस्कटॉपला मागणी का वाढतेय?अन्य संगणकाच्या तुलनेत डेस्कटॉपवर सुलभतेने काम करता येते. त्यातच आता वेगळा सीपीयू नसतो. ऑल इन वन युनिट येते. त्यामुळे जागा कमी लागते. अधिक वेगवान दर्जाचे मायक्रो बोर्ड, प्रोसेसर असल्याने हे संगणक अधिक वेगवान असतात.
अशी वाढली वर्षाकाठी मागणीवर्ष डेस्कटॉपची विक्री (कोटीमध्ये)१९९० ते २००० ६ ते ७२००० ते २०१० ४ ते ५ २०१० ते २०२० ४ २०२० ते २०२५ ६ ते ८
खोलीभर आकाराचा संगणक१९७० च्या दशकामध्ये मुंबईमध्ये केवळ दोन संगणक होते. एक मुंबई आयआयटीमध्ये होता तर दुसरा बीएआरसीमध्ये. या दोन्ही संगणकांचा आकार एका खोलीएवढा होता. गेल्या ५५ वर्षांमध्ये खोलीएवढा संगणक ते फॅब्लेट अर्थात हाताच्या तळव्यावर मावणारा संगणक असा संगणक तंत्रज्ञानाचा प्रवास झाला आहे.
लॅपटॉपची स्थिती काय?लॅपटॉपच्या मार्केटमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये ७ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ दिसत आहे. वर्षाकाठी सरासरी १ कोटी ३० लाख लॅपटॉप विकले जातात. तसेच सेकंडहँड लॅपटॉपलाही उत्तम मागणी आहे.