मोबाइलची बॅटरी लवकर उतरणे ही सर्वांनाच भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे सतत फोन चार्ज करणे किंवा पॉवर बॅक सोबत ठेवणे अशी कामे करावी लागतात. पण मोबाइलची बॅटरी उतरणे ही समस्याच शिल्लक राहणार नाही अशी शक्यता आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, लवकरच तुम्ही तुमच्या कपड्यांनी मोबाइल चार्ज करु शकणार आहात. वैज्ञानिक एका चार्जिंग डॉकसारखं काम करणाऱ्या खिशाची निर्मिती करत आहेत. म्हणजे याने तुम्ही मोबाइल चार्ज करु शकणार आहात.
यावर अभ्यासकांचं म्हणणं आहे की, सोलर पॅनलच्या या टेक्नॉलॉजीमुळे कार्बनच्या उत्सर्जनाला कमी केलं जाऊ शकतं. आणि कपड्याचा खिसा एका पॉवर बॅकप्रमाणे काम करेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सॉकेटची गरज पडणार नाही.
एक फोन चार्ज करण्यासाठी २ हजार पॅनलची गरज असते. संपूर्ण पॅनलचा आकार ३ मिमी लांब आणि १.५ मिमी रुंद आहे. हे सहजपणे कपड्यात शिवलं जाऊ शकतं. त्यामुळे लोक याच्या मदतीने रस्त्यातच मोबाइल चार्ज करु शकतील. या शोधाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक तिलक डायस म्हणाले की, ही पद्धत पर्यावरणाला अनुकूल असेल. याने कार्बन उत्सर्जनातही कमतरता येईल.
यासाठी वापरलं जाणारं फायबर छोट्या सेल्सच्या नेटवर्कने तयार केलेलं असेल आणि याने इलेक्ट्रीसीटी जनरेट होईल. या एनर्जीने डिवायसेज चार्ज करु शकाल. हे दिसणार नाही आणि कपडे परिधान केल्यावर जाणवणारही नाही.