अॅपलच्या आयफोन १७ ने भारतात कमालीची क्रेझ निर्माण केली आहे. मुंबई, पुण्यात अॅपल स्टोअरला खरेदीदारांचा पूर आला होता. हा पूर ओसरत नाही तोच आता आयफोनच्या या नव्या अॅल्युमिनिअम फ्रेमने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे हे नवीन रंगाचे आयफोन घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग बदलू लागले आहेत.
सोशल मीडियावर लोकांनी आयफोनच्या रंगाबाबत आणि अॅल्युमिनिअम फ्रेमबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांचे आयफोन थोडे जरी घासले तरी वरचा रंग खरचटून जात आहे. यामुळे आतील अॅल्युमिनिअम दिसत आहे. यामुळे ज्यांना आयफोन १७ घ्यायचा असेल त्यांनी सिल्व्हर रंगाचाच आयफोन घ्यावा असे सल्ले दिले जाऊ लागले आहेत.
तसेच अॅल्युमिनिअम हे वजनाने हलके आणि मऊ असते हे आता सर्वांनाचा माहिती आहे. कारण प्रत्येकाच्या घरात या धातूची भांडी आहेत. हा आयफोन १७ जरा जरी पडला तरी त्याची बॉडी, कॉर्नरना खोक पडत आहे. ती पुन्हा दुरुस्त होणारी नाही. तसेच अॅल्युमिनिअम हा धातू रंग धरून ठेवणारा नाही, यामुळे त्यावर वेगवेगळे रंग देता येत नाहीत, तरीही अॅपलने पुन्हा अॅल्युमिनिअम बॉडी आणल्याने त्यावरही ग्राहक टीका करू लागले आहेत.