दोन कंपन्यांमधील अॅड वॉर, एकमेकांना टोले हाणण्याचे प्रकार जगाला काही नवीन नाहीत. एकमेकांच्या कंपन्यांतील कर्मचारी पळविण्याचे प्रकारही छोट्या-मोठ्या कंपन्यांत चालतात. परंतू, डिझायनर पळविला म्हणून थेट पहिल्या कंपनीच्या मालकाने दुसऱ्या कंपनीच्या मालकाला एक्स प्लॅटफॉर्मवर टॅग करणे आणि टोला हाणणे हा प्रकार मात्र नव्यानेच घडला आहे.
झाले असे की कंपन्या आपापली उत्पादने दुसऱ्यापेक्षा सरस कशी हे सांगत असतात. परंतू, ती सरस बनविण्यासाठी देखील जे व्यक्ती कारणीभूत असतात त्यांना आपल्या कंपनीत घेण्यासाठी ना ना तऱ्हेचे फासे फेकतात. अॅपल आणि नथिंगमध्येही असेच काहीसे घडले आहे. कार्ल पेई या नथिंगच्या सीईओंनी थेट अॅपलचे सीईओ टिम कुक यांनाच टॅग करत सणसणीत टोला हाणला आहे. कार्ल पेई हे वनप्लसशी संबंधीत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वीच नथिंग ही स्मार्टफोन कंपनी लाँच केली आहे.
सॉफ्टवेअर क्रिएटिव्ह डायरेक्टर म्लाडेन एम होयेस यांनी काही दिवसांपूर्वीच ते अॅपलमध्ये नवीन जबाबदारी सांभाळत असल्याचे जाहीर केले होते. नथिंगच्या युआय डिझाईन आणि फोनच्या डिझाईनने जगाचे लक्ष वेधले होते. मिनिमलिस्ट डिझाईनमुळे हे फोन लोकांच्या नजरेत भरले होते. भारतातही हे फोन उपलब्ध आहेत, परंतू ते निमशहरी भागात फारसे प्रचलित नाहीत. अनेक लोकांना या कंपनीबद्दल, फोनबद्दल माहितीही नाही. तसेच शहरे सोडली तर कंपनीची सर्व्हिस सेंटरही नाहीत.
कार्ल पेई यांनी होयेस यांना शुभेच्छा दिल्या, परंतू त्याच ट्विटमध्ये त्यांनी टिम कुक यांना टॅग करत जर तुम्हाला उत्पादनासाठी आणखी काही मदत हवी असेल तर मला कळवा, असेही म्हटले आहे. यामुळे आता टिम कुक पेई यांच्या या टोल्याला कसे उत्तर देतात याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.