अॅपलने नुकत्याच झालेल्या इव्हेंटमध्ये आयफोन १७ सिरीज लाँच केली आहे. आयफोन १७ चे चार मॉडेल बाजारात येत आहेत. नवीन डिझाईन, कलर्स आणि फीचर्स यात देण्यात आलेली असली तरी अनेकजण आयफोन १६ ची किंमत कधी कमी होते आणि कधी आपण त्यावर उडी मारतो याची वाट पाहत बसले आहेत. पण अशा डोळा ठेवून असलेल्यांसाठी एक बातमी येत आहे.
अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल आणि आयफोन १५ चे एक मॉडेल कायमचे बंद करून टाकले आहे. यामुळे जर तुम्ही ही बंद केलेली मॉडेल घ्यायला गेलात तर तुमचाच विचका होणार आहे. बंद पडलेल्या मॉडेलपेक्षा चालू असलेले मॉडेल घेणे कधीही चांगले, कारण ते मार्केटमध्ये असते म्हणून तुम्ही घेतलेल्या फोनचे मार्केट टिकून राहते.
अॅपलने iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max ही दोन मॉडेल बंद केली आहेत. तसेच आयफोन १५ चे बेस मॉडेलही बंद केले आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवरून हे फोन हटविले आहेत. आता ते तुम्हाला स्टॉक असेपर्यंत अधिकृत विक्रेते, ई कॉमर्स आदींकडे मिळणार आहेत. नवीन मॉडेल्सना मागणी वाढविण्यासाठी कंपनीने हा खेळ खेळला आहे.
आयफोन १६ च्या या दोन्ही फोनमध्ये अॅपल इंटेलिजन्स सपोर्ट मिळत होता. आता तुम्हाला यासाठी नवीन मॉडेल्सच घ्यावी लागणार आहेत. iPhone 17 सिरीजमध्ये A19 चिपसेट देण्यात आला आहे जो आधीच्या ए१८ पेक्षा २० टक्के वेगवान आहे. तर iPhone Air आणि iPhone 17 Pro मध्ये A19 Pro प्रोसेसर देण्यात आला आहे. तो ४० टक्के वेगवान असल्याचा दावा करण्यात आला आहे.