6G Technology: भारतात 6G टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. IIT हैदराबादने 7GHz बँडमध्ये 6G प्रोटोटाइपचे यशस्वी परीक्षण केले आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, हे तंत्रज्ञान 2030 पर्यंत रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. विद्यमान 5G च्या तुलनेत हे अधिक वेगवान असेल आणि गाव-शहर, आकाश, जमीन आणि समुद्र अशा सर्व ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाईल.
2030 पर्यंत देशभरात 6G रोल आउट
आयआयटी हैदराबादचे प्रा. किरण कुची यांच्या मते, दर दहा वर्षांनी मोबाईल टेक्नॉलॉजीची नवी जनरेशन विकसित केली जाते. 5G तंत्रज्ञान 2010-2020 दरम्यान विकसित झाले, तर 2022 पासून याचा देशात विस्तार सुरू झाला. 6G प्रोटोटाइप तयार करण्याची सुरुवात 2021 मध्ये झाली असून, 2030 पर्यंत ते सुरू होण्याची शक्यता आहे.
लो-पॉवर चिप डिझाईन
6G तंत्रज्ञानासाठी आयआयटी हैदराबादने एक लो-पॉवर सिस्टीम चिप डिझाईन केली आहे, जे नागरिक व संरक्षण क्षेत्रात टेरेस्ट्रियल आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पुरवेल. सध्या आयआयटी हैदराबाद हे तंत्रज्ञान हाय-परफॉर्मन्स 6G–AI चिपसेट्स मध्ये विकसित करण्याचे काम करत आहे. तज्ज्ञांच्या मते भारताचे हे पाऊल त्याला आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणेल.
6G मुळे AI-युक्त डिव्हाइसेसचा अनुभव अधिक दर्जेदार
6G आल्यानंतर AR/VR, AI-युक्त डिव्हाइसेस आणि ऑटोनॉमस मोबिलिटीचा अनुभव अधिक चांगला होईल. फॅक्टरी, शाळा, रुग्णालय, संरक्षण क्षेत्र व आपत्ती व्यवस्थापनात 6G डिव्हाइसेस महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे देशाची उत्पादकता व सुरक्षा क्षमता वाढेल.
टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताची ट्रेंडसेटर भूमिका
भारताने अलीकडे नेटवर्क्स, डिव्हाइसेस, AI ॲप्लिकेशन्स आणि फॅबलेस चिप डिझाईनमध्ये स्वदेशी इनोव्हेशनला मोठे प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे भारत आता ग्लोबल सप्लायर आणि स्टँडर्ड सेटर म्हणून उदयास येत आहे. 2030 मध्ये जेव्हा जगभरात 6Gचा प्रसार होईल, तेव्हा भारत स्वतःच्या टेक्नॉलॉजी, प्रॉडक्ट्स, कंपन्या आणि इकोसिस्टीमच्या मदतीने 2047 च्या विकसित भारताच्या विजनकडे वाटचाल करेल.