इचलकरंजी : शहरातील वस्त्रोद्योगाला पुन्हा भरारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आधुनिकीकरणामुळे यंत्रमागावर निर्यातीत दर्जाचे कापड तयार होऊन त्याचा फायदा यंत्रमागधारकाला व्हावा, असे नियोजन केले जात आहे. शासकीय योजनांद्वारे यंत्रमाग व्यावसायिकांचे आधुनिकीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. इचलकरंजी टेक्स्टाईल पार्कचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे तरुण उद्योजकांनी या व्यवसायात उतरावे, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.यंत्रमागधारक युवक संघटनेच्यावतीने येथील तोष्णीवाल गार्डन येथे झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, राजगोंड पाटील, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आवाडे म्हणाले, केंद्रात कॉँग्रेस सरकारची राजवट असताना उद्योगधंद्यांना पूरक आणि विकासात्मक ध्येय-धोरणे राबविल्याने त्यांचा विकास झाला. यंत्रमाग उद्योगासाठी २३ कलमी पॅकेज, विजेची पोकळ थकबाकी माफ, पॉवरलूम डेव्हलपमेंट क्लस्टर, शहराला औद्योगिक दर्जा, डी प्लस झोनची सुविधा, आदी धोरणांचा लाभ कॉँग्रेसने यंत्रमाग व संलग्न उद्योगास दिल्यानेच इचलकरंजी नावारुपाला आली. वस्त्रनगरीची ओळख जागतिक बाजारपेठेत निर्माण झाली. ज्यामुळे इचलकरंजी शहर व परिसरात साध्या यंत्रमाग कारखान्यांबरोबरच सेमी आॅटो व आता आॅटोलूमचे कारखाने मोठ्या संख्येने उभे राहिले. ज्यामुळे हजारो हातांना यातून रोजगार उपलब्ध झाला. आता इचलकरंजीची गारमेंट सिटी म्हणून नवीन ओळख निर्माण होत असून, टेक्स्टाईल पार्कचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे तरुण उद्योजकांनी या व्यवसायात उतरावे. भारत बोंगार्डे यांनी स्वागत व तात्यासाहेब कुंभोजे यांनी प्रास्ताविक केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सचिन लायकर, राजू देसाई, अमर स्वामी, सचिन हेरवाडे, अभिजित रवंदे, तानाजी भोसले, अक्षय बरगे, राकेश बरगे, आदींनी परिश्रम घेतले. विनायक बचाटे यांनी आभार मानले.
तरुणांनी वस्त्रोद्योगात उतरावे
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST