ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 4 - सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी दिली.
उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यास मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्याशी चर्चा करून शुक्रवारी रात्री भीमा नदीपात्रात १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे. हा विसर्ग शनिवारी सकाळी २६०० वाढवून तो ४२०० क्युसेक्स करण्यात येणार आहे. उजनी धरणाच्या पाणी सोडण्याच्या प्रत्येक गेटचा विचार करून व एक ठोकताळा बांधून पाणी सोडण्यात येते.
सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, शिरभावी पाणीपुरवठा योजना, कासेगाव पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी एकूण ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसाठी बंधारे आहेत, अशा ठिकाणी हे पाणी साठवण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर औज बंधारा, पंढरपूर बंधारा, मंगळवेढ्यातील बंधा-याचा समावेश आहे. हे बंधारे या पाण्यातून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. भीमा नदीवरील इतर १७ बंधारेही शेतीच्या पाण्यासाठी भरून घेण्याची मागणी होत आहे.