दक्षिण सोलापूरसाठी उजनीचे पाणी फक्त कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:22+5:302021-04-27T04:22:22+5:30

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी ...

Ujjain water for South Solapur only on paper | दक्षिण सोलापूरसाठी उजनीचे पाणी फक्त कागदावरच

दक्षिण सोलापूरसाठी उजनीचे पाणी फक्त कागदावरच

Next

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले. तालुक्यासाठी धरणात आरक्षित ठेवलेले पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. पाणी देणाऱ्या योजना रखडल्या. त्यामुळे उजनीचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी मृगजळ ठरले. या तालुक्याने पाण्यासाठी सर्वाधिक संघर्ष केला. तरीही प्रतीक्षा संपली नाही. कधी योजनेला निधी मिळत नाही तर कधी सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याचे कारण सांगत पाणी कागदावरच राहिले.

सध्या कुरुल शाखा कालवा आणि बेगमपूर कालव्यातून तालुक्यातील कंदलगाव, वडकबाळ, मंद्रुप, गुंजेगाव आदी भागांना प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी मिळते. मात्र, एकरुख उपसा सिंचन योजना पूर्णत्वास न आल्याने ७२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. ही योजना पूर्ण झाली असली तरी आरक्षित असलेले पाणी पूर्ण क्षमतेने मिळेल, ही आशा आता शेतकऱ्यांना वाटत नाही. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष केला; पण मिळालेले पाणी प्रत्यक्ष शेतात कधी पोहोचणार या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. विशेषतः उजनीचे पाणी मिळेल या भरवशावर तरुण पिढी शेती क्षेत्रात उतरली. मात्र, त्यांचाही भ्रमनिरास झाला आहे.

आठमाहीची ऐतिहासिक घोषणा

उजनीचे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे, या मागणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे दिवंगत आनंदराव देवकते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर याच तालुक्यात कंदलगाव येथील पाणी परिषदेत शंकरराव चव्हाणांनी उजनीचे बारमाही धोरण बदलून आठमाही केले. त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्याला झाला. सिंचन क्षेत्रात दुपटीने वाढ झाली; पण ज्या तालुक्याने संघर्ष केल्यामुळे उजनीच्या धोरणात बदल करावा लागला तोच तालुका आजही वंचित आहे.

एकरुख योजना अर्धवटच

१९९६ साली प्रशासकीय मान्यता मिळालेली एकरुख उपसा सिंचन योजना तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील ३४ गावांना उपयुक्त ठरणार आहे. मात्र, योजनेचे काम २५ वर्षांनंतरही अर्धवट स्थितीत राहिल्याने पाणी मिळणार कधी? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांत आहे. सध्या याच योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील बोरी धरणात सोडण्याची तयारी झाली; पण दक्षिण सोलापूरची कालव्याची कामे अपूर्ण, भूसंपादन नाही, अंतर्गत पाइपलाइनची कामे अपूर्ण या कारणाने येत्या दोन वर्षांत पाणी मिळण्याची शक्यता धूसर दिसते.

दोन्ही योजना अधांतरी

एकरुख योजनेतून दक्षिण सोलापूर तालुक्याला ७,२०० हेक्टर तर देगाव जलद कालव्यातून ३,८६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दोन्ही योजनांचे भवितव्य आज तरी अधांतरीच आहे. एकरुखचे काम रेंगाळत सुरू आहे, तर देगाव कालव्याच्या कामांसाठी आवश्यक निधी मिळत नाही. त्यामुळे ११,०६० हेक्टर क्षेत्राला उजनीच्या पाण्याचे वेध लागले आहेत.

१४ गावांचे स्वप्न अपुरे राहणार

तालुक्यातील बोरामणी, तांदूळवाडी, मुस्तीसह १४ गावांना उजनीचे पाणी मिळावे, यासाठी दिवंगत उमाकांत राठोड यांनी संघर्ष केला. आजी-माजी आमदारांनी या योजनेसाठी राजकीय वजन वापरले; परंतु उजनी प्रकल्पात नव्या योजनांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने १४ गावांना पाणी देणार कसे, असा सवाल जलसंपदा विभागाचे अधिकारी विचारत आहेत.

फाेटो

२६दक्षिण सोलापूर०१

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील अर्धवट स्थितीत असलेला देगाव जलद कालव्याचा जलसेतू.

२६दक्षिण सोलापूर०२

उजनीच्या पाण्याचे तालुकानिहाय झालेले नियोजन.

Web Title: Ujjain water for South Solapur only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.