अक्कलकोट : पाणी आणायला गेल्यावर पाय घसरून विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे घडली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
राजश्री दयानंद नागेनवरू (वय २१), लक्ष्मी संजय नागेनवरू (वय १२, दोघी रा. बरडोल, ता. चडचण, जि. विजयपूर) अशी त्या मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत संजय महादेव नागेनवरू (वय ३२) यांनी खबर दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री नागेनवरू, लक्ष्मी नागेनवरू या दोघी पिण्याचे पाणी आणतो म्हणून सिद्धलिंग शांतप्पा फुलारी यांच्या शेताकडे गेल्या. विहिरीतून पिण्याचे पाणी घागरीत भरताना पाय घसरून विहिरीमध्ये पडल्या. पाण्यासाठी गेलेल्या दोघीही न आल्याने विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघी दिसून आल्या नाहीत. विहिरीत बघितले असता त्या पडल्याचे दिसून आले. दोघींना विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघी उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.