पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सदाशिव शिंदे (वय ४९, रा.आंबे, ता.पंढरपूर) यांना आंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून घेतले. वाळू चोरून काढण्यासाठी शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरून व गैरकायद्याची मंडळी जमवून संगनमत करून शिंदे यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली व फिर्यादीच्या सर्वांगावर मुकामार दिला.
संभाजी शिंदे यांचा मुलगा दीपक शिंदे हा भांडणे सोडवित असताना, त्यालाही हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. संभाजी व दीपक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे येत असताना, चळेपाटी येथे रोडवर त्यांचा एमएच १४/ इडब्ल्यू ११११ या वाहनामधून पाठलाग केला. या दरम्यान तानाजी शिवाजी शिंदे हा, घाल याच्या अंगावर गाडी, सोडू नको, खल्लास कर, असे मोठ्याने ओरडत त्यांच्या मोटारसायकलवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता.
या प्रकरणी तानाजी शिवाजी शिंदे, बापू शिवाजी शिंदे, हरि शिवाजी शिंदे, निशाल बापू शिंदे, विकास बापू शिदे, धनाजी उद्धव शिंदे, शंकर राजाराम शिंदे, सिद्धू सुरेश नागणे, आनंदा जनार्धन सगर, बाबुराव मनोहर जाधव (सर्व रा.आंबे, ता.पंढरपूर) यांनी मारहाण केली. या प्रकरणी संभाजी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. किरण अवचर करत आहेत.
शेगाव दुमाला वाळू उपसा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव दुमाला (ता.पंढरपूर) येथील भीमा नदी पत्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर पोलिसांनी अहिल्यादेवी चौकाजवळ टेंभुर्णी रोडवर भंटुबरे (ता.पंढरपूर) येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता कारवाई केली. या कारवाईत २ लाख ५८ हजार रुपये किमतीचे विना नंबरचे वाहन, ८ हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू व ३ लाख ८ हजार रुपये किमतीची एमएच १३ /डीक्यू ०९४४ हे वाहन व त्यात ८ हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू असा ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गणेश शिवाजी अटकळे (वय २७), शरद गुलाब चव्हाण (वय २६, रा.शेगाव दुमाला), समाधान कांतीलाल मिसाळ (वय ३०, रा.शेवते ता.पंढरपूर), सुहास सुनील सोनवणे (वय २०, रा.तरटगाव, ता. इंदापूर, जि पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
तुंगतमध्ये अवैध दारू जप्त
तुंगत (ता.पंढरपूर) येथील स्टँडजवळ असलेल्या कमानीजवळ सोमनाथ उत्तम भोसले (वय २४, रा.तुंगत, ता.पंढरपूर) याच्याकडे बेकायदा बिगर पास परमिटने बाळगलेल्या परिस्थितीत दारू मिळून आली. या कारवाईत ८० हजार रुपये किमतीची एमएच १४ /सीएक्स ५१३३ क्रमांकाचे वाहन व २८ हजार ५८४ रुपये किमतीची दारू असा १ लाख ८ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोनि.किरण अवचर यांनी सांगितले.