अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना समाजात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हातात तलवार, कुऱ्हाड, लाकडी दंडुके घेतलेल्या सातजणांचा फोटो व्हाॅट्स ॲपच्या स्टेट्सवर लोड केला असल्याची माहिती मिळाली. त्याअधारे अकलूज पोलिसांनी पिसेवाडी येथील सतीश सदाशिव इंगळे यास सुरवातीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांची दिलेली माहिती व स्थळाची खात्री करून पोलिसांनी दीपक शिवाजी भाकरे, शहाजी जनार्दन इंगळे, शैलेश शहाजी भाकरे, महेश नवनाथ भाकरे, सागर अच्च्युतराव चव्हाण, सतीश सदाशिव इंगळे व समाधान निवृत्ती भाकरे (सर्व रा. पिसेवाडी, ता. माळशिरस) यांना अटक केली. त्यांच्यावर आर्म ॲक्ट कलम ४\२५ व मुंबई पोलीस कायदा क्र. १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर संशयित आरोपींना न्यायालयात हजर केेले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पो. नि. भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार बाळासाहेब पानसरे, संतोष घोगरे, सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विश्वास शिनगारे, मंगेश पवार, नितीन लोखंडे, नीलेश काशिद, विक्रम घाडगे, मनोज शिंदे यांनी केली. तपास सुहास क्षीरसागर करीत आहेत.
‘त्या’ तरुणांवर यापूर्वीच मारामारी, ॲट्रॉसिटीचे गुन्हे
त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील हत्यारे कोयते बनविणाऱ्या फिरस्तीकडून तयार करुन घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यातील तरुणांवर अकलूज व वेळापूर पोलीस ठाण्यात मारामारी व ॲट्राॅसिटीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना दिसून आले. सदर सर्व संशयित आरोपी हे वय वर्षे वीस ते पंचविशीच्या आतील असून, मारहाणीचे गुन्हे असलेले हे तरुण घातक हत्यारे हाती घेत त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याने पालक वर्गही चिंतित झाला आहे.