- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी, तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या अनेक गावांमधील नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. एवढेच नव्हे, तर या पुराच्या पाण्याचे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ५६ गावे अंधारात असून, ३८०० वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. उपकेंद्र अन् ट्रान्सफाॅर्मर पाण्यात असल्याची विदारक स्थिती दिसून येत आहे.
दरम्यान, सातत्याने महापुराचे पाणी गावात शिरत असल्याने गावाशेजारील ट्रान्सफाॅर्मर पाण्यात आहेत. पुढील धोका ओळखून उपकेंद्रातून त्या ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा, मोहोळचे कार्यकारी अभियंता गावागावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शिवाय वीजयंत्रणेपासून दूर राहण्याच्या सूचनाही महावितरणकडून वेळोवेळी बाधित गावातील लोकांना देण्यात येत आहेत.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती- ८ उपकेंद्रांना पाण्याचा वेढा- ५६ गावातील वीजपुरवठा बंद- २४५२ रोहित्रांना बसला फटका- ३८०० वाहिन्या पडल्या बंद
या भागातील वीजपुरवठा ग्राहकांना बसला फटकाकरमाळा, माढा, कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यातील २७ हजार ८२५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. यात १७हजार ९३० बाधित शेतकरी असून, उर्वरित ग्राहक हे बिगर शेतीग्राहक आहेत. शेतीपंप व गावठाण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
पावसामुळे महावितरणच्या वीज खांब कोसळणे, रोहित्रे जळणे, केबल्स तुटणे आणि ट्रान्सफॉर्मर बंद पडणे यांसारख्या समस्यांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आणि विजेच्या कडकडाटामुळे आमच्या यंत्रणेवर परिणाम होत आहे. दुरुस्तीसाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. पाणी ओसरल्यास वेगाने दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येईल. कोणतेही अनुचित घटना घडू नये, यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत. - सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर