सोलापूर इलेक्शन : शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला बहुमतअरूण लिगाडे - आॅनलाईन लोकमत सांगोलातालुक्यात जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला जरी बहुमत मिळाले असले तरी महुद व एखतपूर गटातील आघाडीच्या उमेदवारांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. या दोन गटात महायुतीने जि. प.च्या २ व पं. स. च्या ४ जागा जिंंकून जोरदार मुसंडी मारली आहे़ कोळा गटात अपक्ष उमेदवार नसता तर कदाचित या गटाचे चित्र वेगळे राहिले असते. याही निवडणुकीत जनतेने आ. डॉ. गणपतराव देशमुख, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पं़ स़च्या सत्तेबरोबर जि़ प़ च्या ५ जागा जिंंकून दिल्या आहेत. सांगोला तालुक्यात आतापर्यंत विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुका शेतीचे व पिण्याचे पाणी यावरच गाजल्या आहेत. मात्र मतदारांनी याही निवडणुकीत आ. देशमुख व दीपक साळुंखे-पाटील यांच्यावर विश्वास ठेवून जि. प. च्या ५ व पं. स. च्या १० जागा जिंंकून देऊन पुन्हा विश्वास दाखविला आहे. यावरुनच गुरुवारी जि. प. च्या ७ जागा व पं. स. च्या १४ जागांच्या मतमोजणीनंतर आघाडी व महायुतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. मतमोजणीच्या सुरुवातीला महुद गटातील तीनही जागा जिंंकून महायुतीने आघाडी घेतली होती. त्यानंतर एखतपूर गटातील तीनही जागा महायुतीने जिंकल्यानंतर आघाडीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. कदाचित महायुतीच्या विजयाचा रथ असाच पुढे चालू राहतो की काय अशा चिंंतेत आघाडीचे नेते, कार्यकर्ते होते. मात्र लगेचच जवळा गटातील निकाल जाहीर होऊन तीनही जागा आघाडीला मिळताच त्यांच्यात विजयाचा उत्साह संचारला. यानंतर मात्र कडलास, नाझरे, कोळा, घेरडी या पाचही गटात आघाडीचे उमेदवार एकामागून एक विजयी होत गेल्याने महायुतीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. महायुतीचे नेते नाझरे, कोळा, घेरडी या गटात विजय मिळेल या आशेने मतमोजणीवर लक्ष ठेवून होते; मात्र तसे काहीच घडले नाही. शेकापचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या महुद गटात महायुतीचे नवखे गोविंंद जरे यांनी आघाडीचे उमेदवार विठ्ठल बागल यांचा १ हजार ९३९ मतांनी पराभव केला. लक्षवेधी ठरलेल्या एखतपूर गटातील महायुतीचे उमेदवार अतुल पवार यांनी आघाडीचे शहाजी नलवडे यांचा सुमारे ५ हजार ९०० मतांच्या फरकाने केलेला धक्कादायक पराभव शेकापच्या नेत्यांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. नाझरे गटात आघाडीचे उमेदवार दादासाहेब बाबर यांनी महायुतीचे विजय शिंंदे यांचा जवळपास २ हजार ५०० मतांनी पराभव केला आहे. या गटात विजय शिंंदे यांचा विजय निश्चित मानला होता परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कोळा गटात आघाडीचे अॅड. सचिन देशमुख यांनी महायुतीचे शिवाजी घेरडे यांचा २ हजार ८०० मतांनी पराभव केला असला तरी याठिकाणी अपक्ष उमेदवार संभाजी आलदर यांना मिळालेली ५ हजार ५०० मते शिवाजी घेरडे यांच्या पराभवास कारणीभूत ठरली आहेत. भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जवळा गटाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती; मात्र या गटावर माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांचे एकहाती वर्चस्व असल्याने तीनही जागा मोठ्या फरकाने जिंंकून महायुतीचा पराभव केला आहे. इकडे घेरडी गटात महायुतीचे यशवंत पुकळे विरुध्द आघाडीचे अनिल मोटे यांच्या लढतीत यशवंत पुकळे यांचा विजय निश्चित मानला जात होता परंतु मतमोजणीनंतर अनिल मोटे हे सरस ठरले आहेत. याही ठिकाणी आघाडीच्या तीनही जागा विजयी झाल्या आहेत. कडलास गटात चमत्कार होईल असे महायुतीला वाटत होते, परंतु प्रत्यक्षात तसे न घडता आघाडीच्या संगीता धांडोरे यांच्यासह गणातील दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाल्याने महायुतीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. ---------------------------कमळ चिन्हामुळे संभ्रम़़महायुतीने जि. प.च्या ६ व पं. स. च्या १२ जागा शिट्टी या चिन्हावर लढविल्या होत्या तर जवळा गटातील तीनही जागा कमळ या चिन्हावर लढविल्या गेल्यामुळे मतदारामध्ये संभ्रमावस्था झाल्याचे बोलले जात होते. कदाचित जवळा गटातही शिट्टीचे चिन्ह असते तर या गटाचा निकाल वेगळा राहिला असता असे मतमोजणीनंतर पराभूत उमेदवारांकडून चर्चेचा सूर होता.
सोलापूर इलेक्शन : शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत
By admin | Updated: February 24, 2017 18:44 IST