आशा वाढली : महापालिका प्रशासन लागले कामाला
..असे मिळाले गुण
सोलापूर : केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेच्या प्रवेशिकेत सोलापूर महापालिकेने भरलेल्या स्कोअर कार्डमध्ये १00 पैकी ९५ गुण मिळाले आहेत. यामुळे स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश होण्याची आशा वाढली असून, गुरुवारी दिवसभर सर्व विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते.
स्मार्ट सिटी योजनेची प्रवेशिका महापालिकेने राज्य शासनाच्या ई-मेलवर सादर केली आहे. या प्रवेशिकेच्या सेल्फ असेसमेंटमध्ये १५ विषयासंबंधित प्रश्न उपस्थित करून त्याला गुणांकन ठेवले होते. यात महापालिकेने राबविलेल्या विविध योजनांची माहिती विचारली आहे. शहरातील शौचालयाची संख्या, ऑनलाईन तक्रार निवारण,ई-न्यूज, जमा-खर्च माहिती, सेवाहक्क अध्यादेशाची अंमलबजावणी, महसुली उत्पन्नाचा चढता आलेख, कर्मचारी वेतन, लेखा परीक्षण, करातून उत्पन्न, पाणीपुरवठय़ाचा खर्च व उत्पन्नाचा मेळ याबाबतची माहिती विचारली होती. या कामातील टक्केवारीवरून गुणांकन केले आहे. सोलापूर महापालिकेने यातील बहुतांशी योजना चांगल्याप्रकारे राबविल्या असल्याने गुण वाढले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेला अपेक्षित ई-गर्व्हनर, जीआयएएसबेस मिळकतकर, दुहेरी नोंदणी पद्धत, गरिबांसाठी मूलभूत सुविधा, युजर चार्जेसची आकारणी यांचा प्रभावीपणे अंमल आवश्यक आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा कशाप्रकारे राबविल्या यावर गुण ठरले आहेत. आता या स्कोअर कार्डची राज्य शासनाच्या हाय पॉवर कमिटीतर्फे पडताळणी होणार आहे. या कमिटीच्या परीक्षेतही उत्तरपत्रिकेला किती गुण मिळतात हे महत्त्वाचे आहे. २0 किंवा २१ जुलै रोजी कमिटीपुढे सोलापूरचा नंबर लागणार आहे. स्कोअर कार्डमध्ये भरलेल्या माहितीची सर्व कागदपत्रे कमिटीला सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे गुरुवारी महापालिकेचे सर्व विभाग माहिती संकलित करण्याच्या कामात व्यस्त होते. सहायक आयुक्त अमिता दगडे—पाटील यांनी माहिती संकलित करून परीक्षेला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केली आहे. (प्रतिनिधी)
राजकीय पाठबळ हवे
स्मार्ट सिटी योजनेच्या परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. याला आता राजकीय पाठबळाची गरज लागणार आहे. स्कोअर कार्डमध्ये नागरिकांचा सहभाग व सूचना यालाही महत्त्व दिले आहे. वॉर्डात बैठका घेऊन नागरिकांना याचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. बैठकीचा व्हिडीओ व फोटोग्राफीसह अहवाल सादर करावा लागणार आहे. गुरुवारी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रभाग ८ मध्ये मोटेवस्ती व साठेचाळ या ठिकाणी बैठका घेतल्या. ■ शौचालय संख्या: २0११—१ लाख ३९ हजार, २0१४— १ लाख ६६ हजार (गुण: १0)
■ ऑनलाईन तक्रार निवारण: २0११ पासून सुरू (गुण: ५)
■ ई-न्यूज लेटर : नुकतीच सुरुवात (गुण: ५), जमा-खर्च माहिती वेबसाईटवर (गुण: ५)
■ सेवाहक्क अध्यादेश: १ जुलै पासून सर्वात आधी (गुण: ५)
■ महसुली उत्पन्नाचा चढता आलेख: २0१२-१३ : १६२ कोटी, २0१३-१४: १९४ कोटी, २0१४-१५: २0८ कोटी (गुण: १0)
■ वेतनाची नियमितता: गेल्या अडीच वर्षात नियमित(५ गुण),लेखा परीक्षण : २0१२-१३ चे काम सुरू (५ गुण)
■ महसुली उत्पन्न: सन २0१४-१५: २८0 कोटी, त्यात मिळकतकर : २0८ कोटी (गुण: १0)
■ पाणीपुरवठा उत्पन्न : ३५ कोटी, मेन्टेनन्स खर्च: ३0 कोटी (उत्पन्नापेक्षा खर्च कमी: ७.५ गुण), भांडवली कामाचा गोषवारा: महसुली उत्पन्न: २0८, भांडवली कामे खर्च: ९७ कोटी (गुण: १0)
■ अत्याधुनिक योजना: १0 गुण, पाणीपुरवठय़ाची कामे: युआरडी योजनेतील कामे ९0 टक्के पूर्ण (गुण: ७.५).