सोलापूर / मंगळवेढा : गेटला कुलूप असूनही नजर चुकवून आत गेल्याने शेततळ्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा दुदैवी अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील यश सचिन कुंभार (वय २) असे मृत बालकाचे नाव आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन कुंभार हे बोराळे येथील शेतात राहत असून त्यांच्या घराशेजारी शेततळे आहे. त्या तळ्यात गेट असून ते बंद केलेले होते. मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास यश घराबाहेर खेळत होता. तर घरातील महिला घरकामात दंग असताना नजर चुकवून यश हा गेटच्या खालून खेळत खेळत शेतातील शेततळ्यामध्ये गेला. पाण्यात पडल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला.
दहा मिनिटात यश दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याची शोधाशोध केली असता तो तळ्यात पडल्याचे लक्षात आले. सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती शैल्य कुंभार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली असून अकस्मात अशी नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल महेश कोळी हे करत आहेत.