चिंचगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर उबाळे,महादेव उबाळे यांच्या संजयमामा शिंदे ग्रामविकास आघाडी विरोधात चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली. त्यामध्ये पाच जागेवर भास्कर उबाळे यांच्या गटाने विजय प्राप्त केला, तर चार जागेवर चंद्रकांत पाटील यांच्या गटाला समाधान मानावे लागले. त्यामुळे चिंचगाव गावावर आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यांचे शंकर उबाळे, राजेंद्र सुतार, रेश्मा उबाळे, कविता उबाळे, संगीता उबाळे असे विजयी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे शंकर उबाळे, हिराबाई जगताप, संगीता देवकर, सूरज अस्वरे हे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
बारलोणी-गवळेवाडी ग्रामपंचायतीत सुरेश बागल व संतोष लोंढे यांच्या जय बजरंग बली ग्रामविकास पॅनलने समोरील व्यंकटेश पाटील यांच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडविला व सर्वच्या सर्व ११ जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. यात पॅनलप्रमुख सुरेश बागल यांना या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली आहेत. या ग्रामपंचायतीवर सन २०११ची निवडणुकीचा अपवाद वगळता गेली ३५ वर्षे या बागल गटाचीच सत्ता आहे.
गवळेवाडी प्रभागातील लक्षवधी ठरलेल्या छाया नवले व पल्लवी नवले या सासू-सुनेच्या लढतीत सून पल्लवी नवले हिने बाजी मारत सासूचा पराभव केला आहे. येथील दोन्ही गट हे आमदार संजयमामा शिंदे यांचेच आहेत.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उपळवाटे ग्रामपंचायतीत यंदा अतुल खूपसे पाटील यांच्या गटाचा धुव्वा उडाला असून, आमदार संजयमामा शिंदे गटाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. येथे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे प्रस्तुत श्री भैरवनाथ ग्रामविकास विकास आघाडीच्या पॅनलने नऊपैकी नऊ जागा जिंकून निर्विवाद एकहाती वर्चस्व प्रस्थापित केली आहे. यात विरोधी अतुल खुपसे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. येथील विजयी उमेदवार राहुल घाडगे, रब्बाना मुलाणी, उज्ज्वला गायकवाड, महेश गोसावी, विशाल खुपसे, सुदामती शेळके, दीपिका देवडकर, बालाजी गरड, मंदाकिनी खुपसे असे आहेत.
चिंचगाव, ता. माढा येथील ग्रामपंचायतीवर आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भास्कर उबाळे गटाचा विजय झाल्यानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार व पार्टी प्रमुख.
टी/यूजर/फोटो/जानेवारी-२१/२४ चिंचगाव