सोलापूर मनपा निवडणुकीसाठी अडीच हजारांवर पोलिसांचा वॉचसोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी व युती तुटल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ८३३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. तसेच निवडणुकीसाठी बाहेर जिल्ह्यांतून बंदोबस्त मागविण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महानगरपालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सोलापूर शहरातून ६ लाख ७३ हजार ९४२ मतदार असून, त्यांच्याकरिता एकूण २६ प्रभागांत ८९६ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मतदाराला आॅटोमध्ये घेऊन जाता येणार नाही, तोच आॅटो किंवा वाहन पुन्हा त्याच मतदान केंद्रावर दिल्यावर ते जप्त करण्यात येणार असल्याचे सेनगावकर यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र थांबता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरातील २४ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, त्याशिवाय मतदानादिवशी शहरात ९० पोलिसांची वाहने व २८ बिट मार्शल फिरणार आहेत तसेच कोणत्याही उमेदवाराने जर काही गैरकृत्य केले तर त्याच्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक काळात पोलीस आयुक्त कार्यालयाने ३५ लाख रुपयांची दारु जप्त केली आहे तर ९३ जणांवर तडीपारीची कार्यवाही केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ----------------------मनपा निवडणुकीसाठी असा आहे बंदोबस्तसपोआ ०७, पोलीस निरीक्षक २३, सपोनि व पोसई ११३, पोलीस कर्मचारी २ हजार १००, पुरुष होमगार्ड ५१५, महिला होमगार्ड ७५, पोलीस उपआयुक्त ०३, सहायक पोलीस आयुक्त ०७ असा पोलीस बंदोबस्त मतदानादिवशी राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरुन बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची बारा ठिकाणी सोय करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
सोलापूर मनपा निवडणुकीसाठी अडीच हजारांवर पोलिसांचा वॉच
By admin | Updated: February 19, 2017 16:33 IST