सोलापूर : उगवणारा प्रत्येक दिवस सोलापुरात उष्णतेची लाट घेऊन येत आहे. सोमवारी या हंगामातील सर्वोच्च ४४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. महिनाअखेर आजवरचा विक्रम मोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या ३२ वर्षांत शहरात दहा वेळा तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे.
दरवर्षी प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात उष्म्याचा त्रास अधिक जाणवत असल्याची अधिकृत आकडेवारी सांगते. दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा असह्य होऊ लागल्यामुळे दुपारी बारानंतर लोक बाहेर पडायला तयार नाहीत. याचा थेट परिणाम बाजारपेठेवरही दिसू लागला आहे. कॉलनी, गल्लीमधील किराणा, स्टेशनरी दुकानेही बंद दिसू लागली आहेत. नवीपेठ, मधला मारुती, टिळक चौक, फलटण गल्ली, चाटी गल्ली परिसरात तुरळक लोक दिसत आहेत.
सोमवारी सकाळी ९ पासूनच सोलापूरकरांना घामाघूम व्हायची वेळ आली. घरात फॅनचे वारे गरम येऊ लागले तर बाहेर उन्हाचा तडाखा या दोन्हीच्या कात्रीत लोक सापडले आहेत. कधी एकदाचा हा उन्हाळा जाईल याची प्रतीक्षा असल्याचा सूर स्वप्निल शिंदे, आकाश सर्वगोड, संदीप चांगभले यांच्यासह शहरवासीयांनी व्यक्त केला.
----
ही ती दहा वर्षे तापलेली
- १९९१ पासून आजतागायत दहा वेळा तापमानाच्या पाऱ्याने ४४ अंशांच्या पुढे टप्पा ओलांडला आहे. त्यात १९९३ साली ६ मे रोजी ४४.५, १६ मे ९४ ला ४४.३, २ जून ९५ ला ४४.८, ६ मे ९८ ला ४४.७, २००१ ला १ मे रोजी ४४.५, २००३ ला १७ मे रोजी ४४.५, २२ एप्रिल २००४ ला ४४, २ मे २००९ रोजी ४४, १८ मे २०१० रोजी ४४.७, २१ एप्रिल २०१६ ला ४४.९ आणि सोमवारी ९ मे २०२२ ४४.३ अशी नोंद हवामान विभागाकडे नोंदली आहे.
----
९ मे योगायोग की भौगोलिक कारण?
पस्तीस वर्षांपूर्वी ९ मे १९८८ साली सोलापूरचे तापमान ४६ अंशांवर पोहोचले होते. ते आजवरचे सर्वोच्च तापमान म्हणून नोंद आहे. नेमके सोमवारीही ९ मे २०२२ रोजी ४४.३ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले. या तारखेचा योगायोग की त्यामागे भौगोलिक कारण आहे, अशीही चर्चा शहरात ऐकावयास मिळाली.
----