सोलापूर : मागील ८० वर्षापासून मुंबईत असलेले केंद्र सरकारचे टेक्स्टाइल आयुक्त कार्यालय आता दिल्लीला हलवले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक तसेच तेलंगणातील उद्योजकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिल्लीला जावे लागणार आहे. केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यंत्रमाग उद्योजक तसेच सहकारी सूत गिरण्यांचे संचालक देत आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यंत्रमाग धारक तसेच सूत गिरणी संचालकांना केंद्रीय टेक्स्टाइल आयुक्त कार्यालयाशी वारंवार संपर्क करावा लागतो. त्यांच्याशी पत्र व्यवहार करावा लागतो. सध्या टफ योजना बंद आहे. टफ योजनेची अंमलबजावणी टेक्स्टाइल आयुक्त कार्यालयामार्फत होते. उद्योजकांच्या मागणीनूसार पुढील काळात टफ योजना सुरू होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांना भविष्यात दिल्ली दरबारी फेऱ्या माराव्या लागतील.