१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरळीत
सोलापूर : १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मोठे आव्हान कामती पोलिसांनी स्वीकारले. सुरुवातीपासून बंदोबस्ताची आखणी केल्यामुळेच अर्ज दाखल होण्यापासून ते मतमोजणीपर्यंत कुठेच गडबड नव्हती ना गोंधळ. कोरवलीतील किरकोळ अपवाद वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कामती पोलीस प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रेरणा दिली होती.
पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या प्रेरणेतून वाघोली-वाघोलीवाडी, शिरापूर मो. व पीरटाकळी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांतपणे पार पडल्या. बेगमपूर व कुरुल या तालुक्यांतील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी तणावाचे वातावरण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता.
चालू पंचवार्षिक निवडणुका ह्या अटीतटीच्या असल्याने गावागावांत राजकीय वातावरण तापले होते. निवडणुका जाहीर झाल्यापासून गावातील गटांच्या लोकांच्या बैठका घेण्यात आल्या. लोकांना बिनविरोध ग्रामपंचायत झाल्यास गावात तंटा व परस्परविरोध राहणार नसल्याचा सामोपचार देण्यात आला. माने यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून, निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. कामती पोलीस प्रशासनाच्या वतीने एकूण ८५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक हे अधिकारी व इतर कर्मचारी असे मिळून ८५ पोलीस कर्मचारी होते.
कोट
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून आम्ही स्वतः प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना निवडणुकांसंदर्भात समुपदेश दिले होते. कोरवली येथील एक अपवाद वगळता इतर एकाही गावात भांडणतंटे झाले नाहीत. प्रत्येक गावातील गावपुढारी मतदारांनी सहकार्य केल्याने ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या.
- अंकुश माने,
सहायक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे