ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 10 - अकलूजची ग्रामदेवता श्री.अकलाई देवीसाठी शुक्रवारी द्राक्षांची आरास करण्यात आली. यानंतर महापूजाही घालण्यात आली. खासदार विजयसिंह मोहिते - पाटील व नंदिनीदेवी मोहिते - पाटील यांनी ही आरा केली आहे. आराससाठी त्यांच्या निमगावातील बागेतील द्राक्ष वापरण्यात आली आहेत. महापूजेनंतर आरासमधील द्राक्षांचे प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटप करण्यात आले.
अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली.
आषाढी पौर्णिमेनंतर प्रथम येणा-या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची यात्रा भरते. त्याला देवीचा भंडारा असे म्हणतात. त्या दिवशी अकलाई मातेस मंगलस्नान, पंचामृती अभिषेक झाल्यावर महावस्त्र परिधान केले जाते. देवीला शृंगार करून महालंकार, महापूजा, महाआरती झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा या काळात देवी मातेची दुग्ध स्नान, सुगंधी स्नान आदी विधिवत पूजा करण्यात येते. दशमीला सायंकाळी सीमोल्लंघनास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला देवीची महापूजा व अलंकारपूजा केली जाते.