कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग सगळयांच्याच गुडघ्याला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:09 PM2018-05-10T15:09:05+5:302018-05-10T15:09:05+5:30
मामाश्री गायकवाड
विजयपूर : काँग्रेस,भाजप, निजद हया तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हे १५ मे रोजी स्पष्ट होणार आहे.
मतदानाला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. २२४ जागांसाठी २,६५५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २१९ महिला व २,४३६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस,भाजप व निजदने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस, व निजदने या दोन्ही पक्षांनी रोजगारनिर्मिती, कृषीक्षेत्र, महिला सबलीकरण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे जाहीर केले आहे. भाजप सत्तेवर आल्यास राष्ट्रीयीकृत बँकेतील शेतकºयाचे कर्ज माफ करण्याची घोषणा जाहीरनाम्यात केले आहे. काँग्रेस-निजदने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरही यामधील तरतुदींवर मतदारांमध्ये फारसा उत्साह किंवा चर्चा होताना दिसत नाही. वेगवेगळया भागात वेगवेगळया मुद्दांवर चर्चा होताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत नमोंनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुती करीत कोणत्याही परिस्थितीत घटना बदल करणार नाही, असे जाहीर केले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दीड-दोन महिन्यापूर्वी घटना बदलण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप विरुद्ध दलितांचा असंतोष भडकला होता. ही गोष्ट लक्षात ठेवून चिकोडीत नमोंनी दलित कार्डचा वापर केला आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना त्यांचे महत्त्व काय कळणार असा सवाल उपस्थित करून दलितांमधील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या नरेंद्र मोदी व सिद्धरामय्या यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नमोंचा प्रत्येक वार परतवण्याचा प्रयत्न सिद्धरामय्यांनी सुरू ठेवला आहे. कारण यासाठी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव जाणवू लागला आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानेच सिद्धरामय्या स्वत:च उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
१२ मे रोजी २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. आजपर्यत जितके सर्वेक्षण झाले त्यामध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्थेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही प्रमुख पक्षातील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांनी शपथविधीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. भाजपने तर दोन वषार्पूर्वीच येडियुराप्पा यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्रीपदाचे येडियुराप्पा हेच उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्यामुळेच की काय येडियुराप्पा यांनी निकालाआधीच शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
१७ किंवा १८ मे रोजी आपण भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसमक्ष कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहे. आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे.माजी मुख्यमंत्री व निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनीही १८ मे रोजी आपण कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहोत, असे जाहीर केले आहे. त्या दिवशी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा वाढदिवस आहे. आपल्या वडिलांच्या वाढदिनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्नाटकाची सत्तासूत्रे आपण आपल्या हाती घेणार आहे. आपल्याला मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा त्यांना विश्वास वाटतो. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही तारीख ठरविण्यात मागे नाहीत. १५ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात आपणच मुख्यमंत्री होणार, असे सांगणाºया सिद्धरामय्या यांनी त्यासाठी १८ मे ची तारीख निश्चित केली आहे.
१२ मे २०१८ रोजी संपूर्ण कर्नाटक राज्यात मतदान होणार आहे. त्यानंतर १५ मे २०१८ रोजी मतमोजणी होऊन कर्नाटकातील चित्र स्पष्ट होणार आहे. तरीही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हे १५ मे रोजी स्पष्ट होणार आहे. तरीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या या तीन नेत्यांच्या मनातील उत्साह ओसंडून वाहात आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोणकोणत्या मुद्दयांना प्राधान्य द्यायचे, कोणते मुद्दे तातडीने हाताळायचे, कोणाला जवळ करायचे, कोणाला दूर ठेवायचे, कोणाची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायची, याचे आडाखे बांधण्यात हे तिन्ही नेते मश्गूल आहेत.
आपल्याच पक्षाला कर्नाटकाची सत्तासूत्रे मिळावीत, यासाठी मतविभागणीच्या कामाला नेत्यांनी सुरुवात केली आहे. निजदपासून अल्पसंख्याकांना तोडण्यासाठी निजद हे भाजपची ह्यबीह्ण टीम आहे, असे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वारंवार म्हटले आहे. यामागे काँग्रेसचे गणितच वेगळे आहे, हे लक्षात येताच एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतर कुमारस्वामी यांनी जर भाजपशी युती केली तर कुमार हा आपला मुलगाच नाही असे समजून त्याला घराबाहेर काढू असे जाहीर केले. ह्यडॅमेज कंट्रोलह्णचा एक भाग म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांचे उघडपणे कौतुक करून नव्या समीकरणाची मांडणी केली आहे. सिद्धरामय्या हे प्रत्यक्षात देवेगौडा यांच्या तालमीत तयार झालेले नेते असले तरी त्यांना ध्रुतराष्ट्राची उपमा देत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. नमोंनी देवेगौडांचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोडलेल्या बॉम्बने कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुमारस्वामी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात छुपी युती झाली आहे. हे दोघे एकाच विमानातून दिल्लीला गेल्याचे पुरावे आपल्याजवळ आहेत, असे सांगत सिद्धरामय्या यांनी निजद आणि भाजप एकच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे दलित, अल्पसंख्याकाना काँग्रेसकडे जखडून ठेवण्याची खेळी आहे. नमोंनी देवेगौडा यांचे केलेले कौतुक, देवेगौडा यांनी नम्रपणे या कौतुकाचा स्वीकार करीत सिद्धरामय्या यांनी पावलोपावली आपला अपमान केला.
नरेंद्र मोदी यांनी केलेले आपले कौतुक फार महत्त्वाचे नसले तरी त्यांनी बाळगलेले तारतम्य व दाखवलेले सौजन्य योग्य आहे, असे देवेगौडा यांनी सांगितले. यामागे वक्कलिग समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण टाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मतदारांना जखडून ठेवण्यासाठी राजकीय पक्षांचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते कामाला लागले आहेत.काँग्रेस आणि जनता दल-एस मध्ये या मतांवर डोळा ठेवून संघर्ष आहे. या निधर्मी जनता दलाने जास्तीत जास्त उमेदवारी देवेगौडांच्या नातेवाईकांना देऊन फॅमिली राजची जोरदार तयारी चालविली आहे. त्याला कर्नाटकातील जनता कितपत प्रतिसाद देईल हे येणारा काळ ठरविणार आहे.
आपण कितीही निधर्मी वा सेक्युलर असल्याचे ढोल कोणत्याही राजकीय नेत्याने बडविले तरीदेखील निवडणुका म्हटल्यानंतर उमेदवारीदेखील जात, पात व धर्म या विषयावरूनच ठरते. त्याही पलीकडे जाऊन अलीकडे जनता व मतदारदेखील या गोष्टींचा पहिला विचार करतात. दुसरा विचार पक्षाचा आणि तिसरा विचार उमेदवारांतील गुणांचा. राजकारणाचा हा दर्जा घसरायला जबाबदार आपण सर्वजण आहोतच परंतु सेक्युलरवादाच्या सर्वच पक्षांचा बुरखा हा २०१८ च्या या निवडणुकीत टराटरा फाडला गेला, हे सत्य आहे.