वीजवापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान! होऊ शकते तुमच्या घरातील वीजमीटरची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:05 PM2021-11-02T19:05:00+5:302021-11-02T19:05:06+5:30

महावितरणची कडक कारवाई; शहरासोबतच ग्रामीण भागात पथकांच्या अचानक भेटी

If power consumption is zero to 40 units, beware! Check the electricity meter in your home | वीजवापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान! होऊ शकते तुमच्या घरातील वीजमीटरची तपासणी

वीजवापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान! होऊ शकते तुमच्या घरातील वीजमीटरची तपासणी

Next

सोलापूर : महिन्याला ज्या ग्राहकांचा वीजवापर शून्य ते ४० युनिट आढळून आल्यास संबंधित वीज ग्राहकांच्या घरी अचानक भेट देऊन मीटरची तपासणी महावितरणकडून करण्यात येत आहे. दरम्यान, तपासणी मोहिमेत वीजचोरी आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे शहर अभियंता चंद्रकांत दिघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे व मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे. सध्या सोलापूर शहर व ग्रामीण भागातील संशयित वीज मीटर व परिसराची तपासणी करण्यात येत आहे. वीजचोऱ्या उघडकीस आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून आकडे बहाद्दरांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे चंद्रकांत दिघे यांनी सांगितले.

----------

११ हजार ९२१ वीज मीटरची तपासणी...

० ते ४० युनिट असलेल्या सोलापूर शहरातील ११ हजार ९२१ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात २० मीटर स्लो रीडिंग चालू असल्याचे आढळून आले. दरम्यान, ११ मीटरमध्ये वीजचोरी आढळून आली. तपासणी मोहिमेत २७ मीटर बंद आढळून आले.

---------

घरगुतीचा वापर दुकानासाठी

- ० मीटर रीडिंग असलेल्या ग्राहकांच्या घरी अचानक भेटी देऊन महावितरणने मीटरची तपासणी केली. या मोहिमेत ४ हजार ७४ ग्राहकांपैकी २ हजार ६९५ वीज मीटरची अचानक तपासणी केली असता २६ ग्राहकांचे वीज मीटर बंद आढळले. एका घरात वीजचोरी, तर ७३ वीज मीटर बंद आढळून आले.

----

दिवाळीत घरात अंधार...

वीजचोरी अथवा आकडे टाकून घरात वीज घेणाऱ्या ग्राहकांवर महावितरणच्या पथकाने कारवाई करून त्यांच्या घरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. या ग्राहकांवर दंडात्मक कारवाईची नोटीस दिली आहे. दंडात्मक रक्कम न भरल्याने शेकडो ग्राहकांच्या घरची वीज बंद असल्याने ऐन दिवाळीत संबंधित ग्राहकांच्या घर अंधारातच असल्याचे सांगण्यात आले.

--------

४ कोटी ४६ लाखांचा दंड...

एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यांत तब्बल संशयित वीज मीटर व परिसराची तपासणी करण्यात आली, तर वीजचोऱ्या उघडकीस आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून आकडे बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. ३२९० ठिकाणी वीजचोरी आढळून आली, तर ३७५ ठिकाणी विजेचा गैरवापर सापडला. तब्बल ३३ लाख ४ हजार ८३६ युनिटची वीजचोरी उघडकीस आणण्याचे काम परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यांना ४ कोटी ४६ लाखांचा दंड लावला आहे.

-----------

वीजचोरांविरोधात महावितरणच्या विशेष पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. ० ते ३० युनिट असलेल्या वीज मीटरची अचानक तपासणी करण्यात येत आहे. वीजचोरांविरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांनी रीतसर जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.

- चंद्रकांत दिघे, शहर अभियंता, महावितरण, सोलापूर

 

Web Title: If power consumption is zero to 40 units, beware! Check the electricity meter in your home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.