रवींद्र देशमुख
सोलापूर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात या शहराचा उल्लेख ‘शोलापूर’ असा केल्याची आठवण जुन्या पिढीतील लोक सांगतात. इथले शहरवासीय ऊर्जावान आहेत. निस्सिम देशभक्त आहेत. त्यामुळेच म्हणे पंडितजींनी असा उल्लेख केेला होता. देशासाठी ‘काही पण’ हे सोलापूरकरांच्या ‘डीएनए’मध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली काय अन् इथले ‘एनसीसी’चे कॅडेटस् तयारीलाही लागले.
सोलापुरात ‘एनसीसी’च्या दोन बटालियन्स आहेत. त्यांची मुख्यालयेही शहरातच आहेत; पण ‘एनसीसी’मार्फत अग्निपथमध्ये सामील होण्यासाठी मुलांना काही प्रोत्साहन दिले जाते काय, असे विचारले असता आम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले; पण काही कॅडेटशी संवाद साधला असता, त्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आम्ही तयारीला लागलो आहोत, असे सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील एक कॅडेट म्हणाला की, लष्करात सामील होण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासाठीच आम्ही ‘एनसीसी’मध्ये सामील झालो आहोत. आता इतक्या लहान वयात सैनिक व्हायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे. अग्निपथ योजनेच्या पहिल्या योजनेमध्ये सहभागी व्हायला मिळावे यासाठी मी अथक परिश्रम घेणार आहे.
सोलापूरचा कॅडेट म्हणाला की, लष्कराच्या या योजनेचा विरोध का होतोय, हे ठाऊक नाही; पण माझ्यासाठी तरी ही संधी आहे. लहान वयात सैन्यात सहभागी व्हायला मिळते, याचा आनंद आहे. सैन्यातील चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पंचवीस टक्के अग्निवीरांना पुन्हा तेथेच काम करता येणार आहे. शिवाय जे बाहेर पडतील त्यांचे वयही कमी असल्याने नोकरीच्या संधी अनेक आहेत, असे त्याने सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ‘एनसीसी’चे लेफ्ट. जनरल गुरुबीरपालसिंग यांनी सांगितले होते की, अग्निपथ ही योजना आमच्या कॅडेटसाठी उत्तम संधी असून, ज्यांच्याकडे ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र आहे त्यांना भरतीमध्ये विशेष सवलत मिळणार आहे. देशाचे एक जबाबदार नागरिक घडविणे, हा ‘एनसीसी’चा प्रमुख उद्देश आहे आणि जे अग्निवीर म्हणून बाहेर पडतील, ते तर अधिक जबाबदार घडतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
--
एनसीसी प्रमाणपत्रांचा लाभ
ज्या कॅडेटस्ना ‘ए’ , ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. त्यांना काही विशेष सवलती देण्यात येतात. ज्यांच्याकडे ‘ए’ प्रमाणपत्र आहे. त्यांना भरतीमधील सामान्य पद, सैनिक आणि ट्रेडस्मनच्या परीक्षेत पाच गुण दिले जातात. ‘बी’ प्रमाणपत्र असलेल्या कॅडेटस्ना वरील तीन पदांसाठी प्रत्येकी १० गुणांचा लाभ मिळतो. ज्यांच्याकडे ‘सी’ प्रमाणपत्र आहे, त्यांना सामान्य पद आणि ट्रेडस्मनची परीक्षा द्यावी लागणार नाही, तर सैनिक भरतीसाठी १५ बोनस गुणांचा लाभ होतो.