केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सत्ताधारी पक्षामार्फत पसरविण्यात येणाऱ्या भ्रमाची पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने राज्यभरात पोलखोल यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची सुरुवात पुणतांबा येथून झाली. ही यात्रा मंगळवारी पंढरपुरात पोहोचली. यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली. यादरम्यान संदीप गिड्डे हे पत्रकारांशी होते.
गिड्डे म्हणाले की, या यात्रेच्या माध्यमातून केंद्राचे कृषी कायदे कसे शेतकरीविरोधी आहेत, याची वाड्या-वस्त्यांवर जाऊन माहिती दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शेतकरी अथवा केंद्र सरकार गेले नाही. न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत घरवापसी नाही, असा पुनरुच्चार संयुक्त किसान मोर्चाचे संदीप गिड्डे यांनी केला.
यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाचे शंकर दरेकर, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वंगे, अरुण कानोरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे उपस्थित होते.
महाराष्ट्रात लोण पोहोचलंय...
दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेली ४९ दिवस झाले आंदोलन करत आहेत. याचे लोण आता महाराष्ट्रात देखील पोहोचलंय. मोदी सरकारच्या कृषी कायद्याची पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने ‘पोलखोल यात्रा’ सुरू केली आहे.
फोटो ::::::::::::: १२पंड०१
संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र पोलखोल यात्रा पंढरीत आल्यानंतर कृषी कायद्याला विरोध दर्शवताना पदाधिकारी. (छाया : सचिन कांबळे)