सांगोला : देशातील ६५ टक्के लोक शेती करतात, शेतकऱ्यांसाठी, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पासाठी राज्यकर्ते पैसे नाही म्हणतात. मात्र त्यांच्याकडे निवडणुका लढविण्यासाठी, घोटाळे करण्यासाठी पैसे आहेत. शेतकरी आता जागा झाला आहे. शेतकऱ्यांना आता रडून काही मिळणार नाही तर लढून आपला हक्क मिळवा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.मंगळवारी सांगोला येथील शिवाजी चौक येथे महायुतीच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आ. पाशा पटेल, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, उपसभपाती उत्तमराव जानकर, प्रा. जयंत बगाडे, संजय भगत, दीपक भोसले, श्रीकांत देशमुख, संजय पाटील-घाटणेकर उपस्थित होते. शेतीमध्ये शाश्वतता निर्माण झाली पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या शेतीमालास, सिंचन प्रकल्पासाठी शासन पैसे देत नाही. मात्र हेच राज्यकर्ते निवडणुकांसाठी वारेमाप पैसे खर्च करतात. महाराष्ट्रात आज त्यांच्याच बँकांत अनेक घोटाळे होत आहेत. राज्याच्या सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना बाजूला करावे लागेल. आम्ही चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांनी संघटित प्रयत्न केल्यास दुष्काळावर मात करता येईल, असेही खा. शेट्टी म्हणाले.राज्यात शेतकरीविरोधी धोरणाने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या श्रमाचा मोबदला मिळायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास केला तसाच संपूर्ण देशाचा विकास करतील यात शंका नाही, असे माजी आ. पाशा पटेल म्हणाले. यावेळी भागवत नकाते, अॅड.नंदू यादव, नितीन बागल, दीपक भोसले, संजय बागल, जयंत बगाडे, श्रीकांत देशमुख यांची भाषणे झाली.----------------------------माढा मतदारसंघातील सर्व दुष्काळी जनतेने त्यांच्या मतदारसंघात मताधिक्य दिले आहे. सांगोला तालुक्याचे अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी संघटित होऊन लढू या. तालुक्याच्या हक्काचे २ टी.एम.सी. पाणी मिळावे यासाठीही लढावे लागेल.- सदाभाऊ खोतस्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष
रडून नव्हे तर लढून हक्क मिळवा
By admin | Updated: June 25, 2014 01:39 IST