पहाटे दोन वाजता काकडा आरतीने दैनंदिन कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर पहाटे ५ वाजता मंदिराचे मुख्य पुजारी धनंजय पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुुले करण्यात आले. दत्त जयंतीचे औचित्य साधून मंदिर परिसर विविध फुलांनी सजविण्यात आला होता. सजावटीसाठी हैदराबाद येथून फुले मागविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक केले होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने अवघी गाणगापूर नगरी भक्तीरसात डुंबून गेल्याचे पाहायला मिळाले.
दुपारी १२ वाजता निवडक भक्तांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रमानंतर ‘श्रीं’स महानैवेद्य दाखविण्यात आला. परगावहून येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर मोफत महाप्रसादाची सोय करण्यात आली. दर्शन आटोपून परतताना भाविकांनी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर भीमा नदीकाठी निसर्ग निर्मित ‘भष्म कुंडा’तील भस्म घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती.
शेकडो भाविकांनी घरोघरी जाऊन माधुकरी सेवा बजावली. बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर संध्याकाळी निर्गुण मठ श्री दत्त मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत रथोत्सवाचे आयोजन केल्याचे मंदिर प्रशासनाचे प्रमुख नामदेव राठोड यांनी सांगितले.
उत्सव पार पाडण्यासाठी समिती प्रमुख नामदेव राठोड व सेक्रेटरी धनंजय पुजारी, सदाशिव पुजारी, गोपालभट्ट पुजारी, नंदकुमार पुजारी, चैतन्य पुजारी, बाळकृष्ण पुजारी, प्रसाद पुजारी, निरंजन पुजारी, मधुकरभट्ट पुजारी, वलभभट्ट पुजारी, राजेंद्र पुजारी, कृष्णभट्ट पुजारी, गोपाळ पुजारी यांनी परिश्रम घेतले.
मास्क, सॅनिटायझरची सक्ती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परगावहून येणाऱ्या सर्व भक्तांना मास्क, सॅनिटायझरची सक्ती करण्यात आली. दर्शनानंतर भाविक तत्काळ मंदिरातून बाहेर जाण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ या राज्यांतून आलेल्या लाखो भक्तांनी गाणगापूरवासी दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
---------