गणपतराव देशमुख यांचे निधन; आज सांगोल्यात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:49+5:302021-07-31T04:23:49+5:30

सोलापूर : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोटावरील ...

Ganapatrao Deshmukh passes away; Funeral at Sangola today | गणपतराव देशमुख यांचे निधन; आज सांगोल्यात अंत्यसंस्कार

गणपतराव देशमुख यांचे निधन; आज सांगोल्यात अंत्यसंस्कार

Next

सोलापूर : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोटावरील शस्त्रक्रियेनंतर गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. आबासाहेब म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित होते.

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

१० ऑगस्ट १९२७ रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या गणपतराव देशमुख यांनी ‘एक झेंडा, एक पक्ष आणि एक मतदारसंघ’ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत ५० वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९७२ आणि १९९५ चा अपवादवगळता ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात सातत्याने निवडून आले. १९७८ ते १९८० साली ते राज्याचे कृषी ग्रामविकास विधी न्याय खात्याचे मंत्री होते. त्यानंतर १९९९ ते २००२ या कालावधीत पणन रोजगार हमी या खात्याचे मंत्री होते. मार्च १९९०, नोव्हेंबर २००४, नोव्हेंबर २००९ साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

काहीवेळा आक्रमक तर काही वेळा सौम्य भूमिका घेऊन गरीब, कामगार, मोलमजूर, शेतकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांंनी लढा उभारला. दुष्काळी सांगोला तालुक्यात फळबागा आणि इतर पिकांचा लागवडीचा कार्यक्रम त्यांनी राबवला. यामुळे सांगोला तालुक्याचा कायापालट झाला.

गेल्या आठवड्यापासून माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्यावर पोटाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते सोलापूरच्या हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होते. मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी रतनबाई, दोन चिरंजीव पोपटराव, चंद्रकांत, एक मुलगी शोभा पाटील, सुना, भगिनी, दोन नातू, १ नात असा परिवार आहे.

--

आज दुपारी सांगोल्यात अंत्यसंस्कार

शनिवारी सकाळी ६.३० वाजता सोलापुरातून त्यांचे पार्थिव पेनूर येथे आणून अर्धा तास तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथून पंढरपूरमार्गे सांगोला येथे पोहोचेल. सांगोल्यात पंचायत समिती कार्यालयापासून कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जयभवानी चौक, नगर परिषदेसमोरून नेहरू चौक, स्टेशन रोडमार्गे आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता सांगोला सूतगिरणीच्या पाठीमागील प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Web Title: Ganapatrao Deshmukh passes away; Funeral at Sangola today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.