श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्या, समाजसेवक, आंतराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांचे नुकतेच निधन झाले. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटना व सर्वपक्षीयांकडून जेठाबाई धर्मशाळेत श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मुक्ती आंदोलनात त्यांचे पती व श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत स्व. शलाका पाटणकर यांनी नोंदविलेला सक्रिय सहभाग, तुकाराम महाराज, वारकरी संप्रदाय यावर त्यांनी केलेल्या कार्याला साहित्यिक सुधाकर कवडे यांनी उजाळा दिला.
स्व. गेल ऑम्वेट या ७० च्या दशकात महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावर पी.एचडी. करण्यासाठी भारतात येतात आणि त्यानंतर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी एकरूप होऊन त्या महाराष्ट्राच्या शोषित, पीडित, महिला कष्टकऱ्यांचा आयुष्यभर आवाज बनून इथेच राहतात. हा प्रवास थक्क करणारा आसल्याचे सुनील सर्वगोड यांनी सांगितले.
तथागत गौतम बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्याची प्रेरणा घेत त्यांनी बुद्धांवर मोठे लेखन केले. तुकाराम महाराजांचे अभंग इंग्रजीत भाषांतरही केले. मराठीसह विविध भाषांत त्यांनी तब्बल ३० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. अनेक वंचित घटकांना त्यांनी हक्क मिळवून दिल्याचे रावसाहेब कसबे म्हणाले, तर श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी क्रांतीची गाणी, कवी सुरेश भटांच्या कवितेतून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी रिपाइंचे सुनील सर्वगोड, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, रावसाहेब कसबे, किरण घाडगे, संदीप मांडवे, माऊली हळणवर, सिद्धार्थ ढवळे, मोहन अनपट, ज्ञानेश्वर महाराज बंडगर, सुनील वाघमारे, रवी सर्वगोड, नागेश झेंडे, सुनील गोळे, राम जवळ आदी उपस्थित होते.
फोटो ओळ :::::::::::::::::
पंढरपूर गेल ऑम्वेट यांना श्रद्धांजली अर्पण करताना सुनील सर्वगोड, सिद्धार्थ ढवळे, सुधाकर कवडे, रावसाहेब कसबे आदी.