आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येत आहे. दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आर्मी शी संपर्क करून एअरलिफ्ट ची व्यवस्था केली आहे. माढा येथे एनडीआरएफचे एक बचाव पथक कार्यरत असून जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करून दुसरे बचाव पथक मिळवले, ते दोन तासात माढा येथे पोहोचणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाागाने सांगितले. लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक सोलापुरात दाखल हाेणार असून बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोठी कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे.
दरम्यान, पाण्यात प्रचंड वाढ होत असून महापुराची स्थिती आणखीन वाढणार असल्याची शक्यता गृहित धरून कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर या भागातूनही बोटी मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय लष्कराशी संपर्क साधून त्यांनाही मदतसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे. तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत.
माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना त्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर काढणे शक्य झालेले नव्हते त्यामुळे सैन्य दलाची चर्चा करून जिल्हा प्रशासनाने त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत.