सरकारच्या उपसमितीने महापुराने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:24 AM2021-07-30T04:24:08+5:302021-07-30T04:24:08+5:30

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे ...

Flood damage by government sub-committee | सरकारच्या उपसमितीने महापुराने नुकसान

सरकारच्या उपसमितीने महापुराने नुकसान

Next

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे सलग दोन वर्षे भीमा नदीला महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने उपसमिती नेमून महापूर टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, राज्य शासनाची ही उपसमिती यावर्षीचा महापूर तरी रोखणार का? असा प्रश्न नदीकाठच्या गावांमधून उपस्थित केला जात आहे. ही उपसमिती आपला अहवाल राज्य शासनाला देणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते का याबाबत उत्सुकता आहे.

कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरत आहे. त्याअगोदर दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे धरण भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. मात्र, त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने अचानक दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडले. एका रात्रीत पंढरपूर तालुक्यातील ४५ गावे व पंढरपूर शहराला या महापुराचा तडाखा बसला. नदीकाठची हजारो हेक्टर पिके भुईसपाट झाली. लाखो घरात पाणी शिरले. घरे पडली, संसार वाहून गेले. त्यामुळे धरण व्यवस्थापन व प्रशासनाच्या विरोधात नागरिक, शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त केला जात होता.

यावर्षीही लवकरच नीरा व भीमा खोऱ्यातील उजनी वगळता इतर धरणे शंभर टक्के भरली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी मायनसमधून प्लसमध्ये येत जवळपास ५० टक्के भरले आहे. वरच्या धरणातून येणारा विसर्ग लक्षात घेता उजनी केव्हाही भरू शकते, अशी परिस्थिती आहे. नीरा नदीतही वीर, देवधर प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा-नरसिंहपूरपासून भीमा नदी आताच दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे भीमा नदीला महापूर येणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपसमिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे दोन दिवसांपासून भीमा नदीकाठचे तालुके, गावांमध्ये जाऊन भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या समितीने नरसिंहपूर, माळशिरस तालुक्यातील नदीकाठची गावे, पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या पिराची कुरोली, भुईवस्ती, गांधीनगर, शेळवे, पटवर्धन कुरोली, आदी गावांना भेटी देऊन शेतकरी, नागरिकांशी संवाद साधला.

------

प्रत्यक्ष पूररेषेचा घेतला आढावा

राज्य शासनाच्या या उपसमितीने शेळवे, वाखरी, पंढरपूर येथील प्रत्यक्ष पूरनियंत्रण रेषेमध्ये जाऊन आढावा घेतला. यामध्ये ओढ्यामार्गे गावात पाणी कसे जाते, अतिक्रमण, घाट, पूल, यामुळे पाणी लोकवस्तीमध्ये कसे जाते, ते थांबविण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेतली. पंढरपूरमधील महापुरामुळे कायम बाधित होणारा संतपेठ, व्यासनारायण झोपडपट्टी, फरशी गल्ली, कोळे गल्ली, परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानुसार ही समिती राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. यावेळी अधीक्षक अभियंता धिराज साळे, कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, उपअभियंता सुनील चौगुले, आदी उपस्थित होते.

----

पूर नियंत्रण रेषेत पाहणी करताना समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी, धीरज साळी, डी. जे. खांडेकर, आदी.

Web Title: Flood damage by government sub-committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.