आप्पासाहेब पाटील, सोलापूर: श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे (ता. उ. सोलापूर) येथील पुटा कारखान्याला रविवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती समजताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पाण्याचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग आटोक्यात आली.
सध्या सिध्देश्वर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. कारखान्याशेजारीच पुटा कारखाना आहे. या कारखान्यात शेकडो टनाचे पुटे ठेवण्यात आले होते. अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत हजारो रूपयांचे पुटे जळून खाक झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी यांनीही मोठी मेहनत घेतली. आग भडकू नये यासाठी कर्मचारी यांनी उर्वरित पुटे बाजूला केले. आगीचे लोळ परिसरात मोठया प्रमाणात पसरले होते. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी अग्निशामक दलासोबतच कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.