False wolves are singing! | लबाड लांडगं सोंग करतंय !

लबाड लांडगं सोंग करतंय !

विलास जळकोटकर

(गाव, शहर, वस्त्यांवर निवडणुकीच्या प्रचाराचा मारा.. गावभेटींचा जोर वाढलाय. घरासमोरून जाणाºया प्रचारफेरीच्या गोंगाटानं टीव्ही पाहत बसलेला पिंंटू बाहेर येतो.)
पिंंटू : (प्रचारफेरीकडे बोट दाखवत) बाबा, ते पाहा आमचे सर. पण, ते इथं काय करताहेत. 
बाबा: अरे, त्यांच्या कर्त्याकरवित्याच्या प्रचाराला आले असतील
पिंंटू : कर्तेकरविते म्हणजे काय हो?
बाबा: (चिडून) पिंंट्या तुला काही सांगायचं म्हणजे डोक्याचा भुगा करून घ्यावा लागतो बाबा.
पिंंट्या: जाऊ द्या बाबा, मी आमच्या सरांनाच विचारतो.. (प्रचारफेरीकडे जाऊ लागतो.) 
बाबा: गधड्या थांब ! (पाठीत धपाटा मारत) 
पिंंटू: तुम्हीच म्हणता ना ! शंका असतील तर विचार म्हणून...
बाबा: (विचारात पडतात) अरे पिंंटू. ते निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहेत ना ! त्यांच्या संस्थेत नोकरीला आहेत.
पिंंटू: म्हणून काय झालं ? सर आम्हाला आपल्या बुद्धीला पटेल तेच करावे, असा उपदेश करतात. मग, सर कसे प्रचारात....
बाबा: पिंंटूबाळा त्यांना त्यांची नोकरी टिकवायची रे. 
पिंंटू: (चेहºयावर प्रश्नचिन्ह) बाबा, मग उपदेशांचं काय ?
बाबा: उपदेशाचा डोस खुंटीला अडकवून काम करावं लागतं. नाहीतर... (पिंंटू काहीवेळ गप्प बसला. पुन्हा न राहून) 
पिंंटू: बाबा ! ते पाहा बबलूचे पप्पा, ते सुद्धा दिसताहेत प्रचारात. ते कुठं सर आहेत. ते तर बँकेत आहेत ना!
बाबा: अरे पिंटू, बँकही त्यांचीच. कारखाने, सहकारी संस्था त्यांच्याच. मग तिथले कर्मचारीही त्यांचेच ना! मग, त्यांनी नको का त्यांचा प्रचार करायला. त्यांना पगार कसा मिळणार ? 
पिंंटू : अहो बाबा ! पण त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो. अशा कामाचा नाही ! (पिंंटूचा अजान प्रश्न)
बाबा: नोकरी म्हणजे तडजोड.. (कंटाळून) आता  बडबड बंद कर.
(बाबा घरात जाऊन टीव्ही आॅन करतात. पंधरा मिनिटांनी बाहेर पुन्हा घोषणांचे आवाज... हळूहळू  जोर वाढतो. काय गडबड चाललीय म्हणून पिंंटूचे बाबा बाहेर येतात. पाठोपाठ पिंंटूही हजर. पदयात्रेत उमेदवारांस घेराव घालून मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू...)
पहिला: आता वाट सापडली का? 
दुसरा:  कामाच्या नावानं बोंब. 
तिसरा: आमच्याकडे पाणी नाही... लाईट नाही... तलाठी अडवतो. तुम्ही आपलं गायब.. (प्रश्नांच्या सरबत्तीनं सकाळच्या वेळीही त्या उमेदवाराला घाम सुटला अन् काही घडायच्या आत सारे पसार होतात.) 
पिंंटू : बाबा, कशी फटफजिती झाली नाही का त्यांची ?
बाबा: अरे बाबा, आता जनता शहाणी झालीय. लबाड लांडगं ढोंग करतंय.. हे समजलंय. बघू काय यंदातरी काय होतंय ते.
पिंंटू: पण बाबा निवडून दिल्यावर कामं करायला नको का? 
बाबा: हो रे ! पण खुर्ची मिळाली ना, सारं विसरतात. 
पिंटू : बाबा! काम न करणाºयांना जमालगोटा मिळाला पाहिजे ?
(पिंंटूने अकलेचे तारे तोडले. हो रे बाळा ! म्हणत बाबा घरात वळतात.)

Web Title: False wolves are singing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.