Even before the mayor arrives, the Guardian Minister inaugurates the highest lights in the square | महापौर येण्यापूर्वीच पालकमंत्र्यांनी केले चौकातील हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण
महापौर येण्यापूर्वीच पालकमंत्र्यांनी केले चौकातील हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

ठळक मुद्देसमाचार चौकात साडेपाच लाख खर्चून हायमास्ट उभारण्यात आला नगरसेवक अमर पुदाले यांनी हायमास्टचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होतापालकमंत्री देशमुख यांनी महापौर बनशेट्टी यांची वाट न पाहता कार्यक्रम उरकला

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाला येण्याआधीच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण केल्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे.

समाचार चौकात साडेपाच लाख खर्चून हायमास्ट उभारण्यात आला आहे. नगरसेवक अमर पुदाले यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजता या हायमास्टचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यासाठी महापौर शोभा बनशेट्टी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

ठरल्याप्रमाणे पालकमंत्री विजयकुमार देशमुख कार्यक्रमास आले. त्यामुळे संयोजकांनी महापौरांशी संपर्क साधला. निरोप मिळाल्यावर महापौरही कार्यक्रम स्थळाकडे निघाल्या. पण पालकमंत्री देशमुख यांनी महापौर बनशेट्टी यांची वाट न पाहता कार्यक्रम उरकला. याप्रसंगी नगरसेवक नागेश भोगडे, अनिल बनसोडे, खंडू बनसोडे, अ‍ॅड. कोंडा, तुळशीदास भुतडा, मोहन क्षीरसागर, विश्वनाथ मादगुंडी, बंटी बेळमकर, बंटी सावंत, मनोज गायकवाड, सतीश भोसले आदी उपस्थित होते. 

कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख निघून गेले. त्यानंतर महापौर बनशेट्टी या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. पण तेथे कोणीच नव्हते. कार्यक्रम संपल्यामुळे सर्व जण निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे त्यांनी नगरसेवक पुदाले यांच्याशी संपर्क साधून त्रागा व्यक्त केला. विशेष म्हणजे गुरूवारी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौºयावर होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री देशमुख दिसले नाहीत. ते परगावी असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. पण सायंकाळी सात वाजेच्या हायमास्टच्या कार्यक्रमास मात्र ते उपस्थित राहिले. 

शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील हा कार्यक्रम त्यांनी चुकविला नाही. पण कार्यक्रमासाठी महापौरांचीही त्यांनी वाट पाहिली नाही. त्यामुळे या परिसरात हा विषय चर्चेचा झाला आहे. सध्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री देशमुख यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर इच्छुकांनीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये महापौर बनशेट्टी यांचाही समावेश आहे. तसेच माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले आहे. 

घुसमट होत आहे: महापौर
- महापालिकेत काम करताना घुसमट होत आहे. शहरातील उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी काल चर्चा केली. त्यांनी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आता २४ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर मुक्कामी आहेत. त्यावेळी त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. पालकमंत्री आले तेव्हा महापौरांना निरोप दिला. पण पाऊस सुरू झाल्याने लोक निघून जाऊ लागल्याने पालकमंत्र्यांनी घाईत उद्घाटन केले ही वस्तुस्थिती आहे.
- अमर पुदाले, नगरसेवक


Web Title: Even before the mayor arrives, the Guardian Minister inaugurates the highest lights in the square
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.