ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १२ - महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पुढील महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. मात्र असे असले तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपा, शिवसेना या पक्षांमध्ये आघाडी वा युतीचा निर्णय झालेला नाही. हे पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढणार की एकत्रितपणे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता त्यांनी ' निवडणुकीचा बिगुल वाजला आता बँड वाजणार ' असे सूचक वक्तव्य केले.
आघाडीबाबत प्रदेश काँग्रेस कमिटी निर्णय घेणार, तरीही मतांची विभागणी होऊ नये म्हणून आघाडी होणे महत्वाचे आहे, असे मत अनेकांनी मांडल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप - शिवसेना हे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत, मात्र आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
रुसून अन्य पक्षात गेलेले काही जण आता पुन्हा पक्षात येण्याबद्दल विचारणा करतात, मात्र मी हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे, असेही ते म्हणाले.
सहन करणाऱ्यांना चांगले दिवस येतात हे विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला