ुकरमाळा निवडणुक; इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची वाढली डोकेदुखीकरमाळा : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चारही गटात इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने नेतेमंडळींची तिकीट फिक्स करताना डोकेदुखी वाढली असून, आपणास तिकीट मिळणार नाही असे अंदाज घेत अनेक इच्छुक या गटातून त्या गटात प्रवेश करीत आहेत तर आपणास बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून नेतेमंडळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर लगेच होणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अॅडजेस्टमेंट करून घेण्याचीही भूमिका घेत आहेत. करमाळा तालुका पंचायत समितीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून बागल गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बागल गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वबळावर निवडणूक लढविणार असून, त्यांच्या सत्तेचा अश्वमेघ रोखण्यासाठी आ. नारायण पाटील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढविणार आहेत तर माजी आ.जयवंतराव जगताप व संजय शिंदे हे दोन्ही गट निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.भाजपाने बैठक घेऊन निवडणुकीची तयारी चालविली आहे.भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. कोण कोणाबरोबर युती करेल याविषयी उलटसुलट चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आ.नारायण पाटील यांच्या बरोबर जगताप गटाची युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे तर जगताप-पाटील युती झाली नाही तर जगतापांची संजय शिंदे यांच्या बरोबर युती होईल असेही बोेलले जात आहे.गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील व शामलताई बागल हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली युती करून एकत्रित लढले होते. त्यांच्या विरोधात माजी आ.जयवंतराव जगताप काँग्रेस आय पक्षाच्या बॅनरखाली विरोधात लढले होते.त्यावेळी संजय शिंदे हे बागल व पाटील यांच्या बरोबर होते.त्यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतसुद्धा संजय शिंदे यांनी बागल व पाटील यांची युती घडवून आणली होती. निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषदेत बागल व पाटील गटाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सहा पैकी सहा तर पंचायत समितीत बारा पैकी दहा उमेदवार विजयी झाले होते. तर जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँगे्रस आयने पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या होत्या.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतसुद्धा बागल-पाटील गटाने निर्विवाद सत्ता मिळवली होती. पुढे बदलत्या राजकीय समीकरणानुसार बागल-पाटील युती संपुष्टात आल्याने संजय शिंदे ही विधानसभा मतदारसंघात उभे राहिले. एक गट व दोन गण कमी..करमाळा तालुक्यात गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सहा गट होते त्यामधून पोथरे जिल्हा परिषद गट कमी होऊन पाच गट राहिलेले आहेत तर पंचायत समितीचे बारा गण होते त्यामध्ये देवळाली,चिखलठाण हे दोन गण कमी झाले आहेत.होऊ घातलेल्या निवडणुकीत पांडे,वीट,कोर्टी,वांगी व केम हे पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत. तर पांडे,रावगाव,केम,साडे,कुंभेज,जेऊर,रावगाव,वीट,कोर्टी,केत्तूर हे दहा गण आहेत.वांगी जिल्हा परिषद गट ,पांडे,वीट ,जेऊर हे गण सर्वसाधारण असल्याने या गट व गणातून आ.नारायण पाटील,बागल गटातून इच्छुकांची संख्या मोठी आहे कोणाला उमेदवारी द्यावी व कोणाला नाराज करावे असा प्रश्न नेतेमंडळींना पडला आहे. नाराज उमेदवार बंडखोरीची भाषा ही बोलू लागला आहे. केम गण हा अनुसूचित जातीकरिता राखीव असून पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या गटात ही इच्छुकांची संख्या मोठी आहे.उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असंतुष्टांच्या खेळीला महत्त्व..करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बहुरंगी होणार असून, बागल,आ.पाटील,जगताप,शिंदे या सर्वच गटातून इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवारी मिळेल की नाही या चिंतेत असणारे इच्छुक कार्यकर्ते या गटातून त्या गटात उड्या मारीत असून प्रवेशाचे वारे सर्वच गटात जोरदारपणे सुरू आहे. उमेदवारी न मिळणारे असंतुष्ट कार्यकर्त्यांच्या खेळीला या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.
ुकरमाळा निवडणुक; इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची वाढली डोकेदुखी
By admin | Updated: January 28, 2017 12:31 IST