सोलापूर : एखाद्याला एखादी वस्तू क्षुल्लक वाटत असते, तर एखाद्याच्या आयुष्यात त्या वस्तूची किंमत ही जिवापेक्षा कमी नसते. शहाजी कांबळे या तरुणाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असलेली त्याची दुचाकी चोरीला गेली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणाने चोराला शिव्या न देता, गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली, तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती सोशल मीडियावर केली.
शहाजी कांबळे याने २०१२ मध्ये एक सेकंड हँड दुचाकी घेतली. ८ मार्चला रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला. दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय? दुचाकी चोरीला गेली. वाट पाहिली. पण, गाडी परत घेऊन कुणी आले नाही.
चालकाने या शब्दात मांडल्या भावनागाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीने माझ्यासोबत लय दुःख भोगलं. माझ्या सर्व दु:खात तिने खांद्याला खांदा लावून साथ दिली. कधी धोका नाही दिला. कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही. माझ्याकडून सर्व्हिसिंग करायची राहून गेली.
प्रत्येकवेळी म्हणणार पगार झाल्यावर करू, पुढच्या पगाराला करू, पण तिची सेवा करायची संधी मिळाली नाही. तिने खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला. मी कुठं जाऊन फिरत होतो. कुठं जाऊन रडत होतो, कुणासाठी रडत होतो, तिला सगळं माहीत आहे.
पण, ती बोलली नाही. चोरट्याला विनंती आहे की, तिला जास्त त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे. तिची काळजी घ्यावी. कधी मला ओळखलंच, तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या.
चोरीला गेलेल्या दुचाकीने अनेक अडचणीत साथ दिली होती. आता ती नसल्यामुळे खूप त्रास होत आहे. अजून तरी पोलिसात तक्रार दिली नाही. गाडी मिळण्याची वाट पाहतोय. शहाजी कांबळे, तरुण.