सोलापूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये लग्नं झाली खरी; पण छोटेखानी समारंभातच. सराफांची दुकानं बंद असल्यामुळे वधूला ना सोनं देता आलं ना दागिने; पण त्याची कसर आता भरून काढली जात असून, अनलॉक - १ नंतर सराफ कट्ट्यावरील व्यवहार सुरळीत झाल्यानंतर वधू, वर पक्षाकडील मंडळी पेढ्यांवर खरेदीसाठी रांग लावून दागिने खरेदी करत असल्याचे पाहायला मिळाले. कुणी वधूला देण्यासाठी; तर कुणी गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करीत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मार्च महिन्यात नेमकी लग्नसराई सुरू झाली आणि कोरोना संसर्गजन्य रोगाने सर्वत्र पाय पसरले़ या काळात सराफ व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला़ व्यवसाय कोलमडला़ गुढीपाडवादेखील होऊन गेला़ या काळात केवळ दोन टक्के लोकांनी आॅनलाईन दागिने खरेदी केली आणि त्यांना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दागिने मिळाले़ तसेच अनेकांनी मुलांच्या विवाहानिमित्त दागिने बनवायला सराफांना आगाऊ रक्कम देऊन नोंदणी केली होती़ बहुतांश वधू-वरांकडील कुटुंबांनी दागिन्याविना विवाह लावून वेळ उरकून नेली़ काहींनी विवाह एक वर्ष पुढे ढकलला़ परिणामत: लॉकडाऊन उठल्यानंतर दुकाने सुरू होताच या लोकांनी तिथी निघून गेल्यानंतर पैसे परत घेण्याऐवजी दागिने खरेदीलाच पसंती दिली आहे.
शहरात सराफांची प्रशस्त दालनं मोठ्या प्रमाणात आहेत़ सर्वांकडे हॉलमार्कचे तयार दागिने आहेत़ ही गर्दी लग्नसराईचीच असल्याचे सराफ व्यावसायिक सांगताहेत़ सुनेला आणि जावयाला खूश करण्यासाठी दागिने खरेदी केली जात आहे. वधूसाठी बांगड्याचा सेट, मंगळसूत्र, राणीहार, चपला हार, नेकलेस, दंडात घातली जाणारी वाकी, तोडे उत्साहाने खरेदी केले जात आहेत.वरासाठी लॉकेट, ब्रेसलेट, अंगठ्या, चेन घेऊन दिले जात आहेत़ विशेषत: जावयाला चष्म्याची फ्रेम देखील सोन्याने बनवून देण्याची प्रथा रूढ होत असल्याचे सराफांनी सांगितले.
७५ दिवसात सोने आठ हजारांनी वाढले- २३ मार्च रोजी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाला़ २० मार्च रोजी सोन्याचा दर हा ४०,५०० रुपये तर चांदीचा दर हा ३९ हजार रुपये होता़ लॉकडाऊन शिथिल करताच ५ जूनपासून सराफ बाजारसह सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली़ लॉकडाऊनच्या जवळपास ७५ दिवसात कुठेही खरेदी नसताना आज सोन्याचा दर ४८ हजार ५०० रुपयांवर तर चांदीचा दर ४९ हजार ५०० रुपयांवर पोहोचला़ अर्थात सोने आठ हजारांनी तर चांदीच्या दरात १०,५०० रुपयांनी वाढ झाली आहे़ वाढलेल्या दराचा ग्राहकांवर परिणाम झालेला दिसून येत नाही़ जीएसटीसह जो दर ठरेल त्या दराने दागिने खरेदी केली जात आहेत़
लॉकडाऊनच्या ७५ दिवसात कुकरमधील वाफ दाबून आल्यासारखे ग्राहक बाहेर पडताहेत़ शासनाने दिलेल्या व्यवहाराची सकाळी १० ते सायंकाळी ५ ही वेळ खूप कमी पडतेय़ या काळात लोकांमध्ये खरेदीची क्षमता वाढल्याचे दिसून येत आहे़ ही गर्दी लग्नसराईचीच आहे़ संचारबंदीमुळे गर्दी न करता विवाह उरकले आहेत. लग्नावर खर्च होणारा पैसा शिल्लक राहिला आणि हेच पैसे जावई, सुनेला दागिन्यांनी सजविण्यावर खर्ची करताहेत़ - मिलिंद वेणेगूरकर, सराफ व्यावसायिक
लॉकडाऊननंतर सराफ बाजारात खरेदीला प्रतिसाद मिळतो आहे़ सुरक्षीतता पाळून रांगेत उभारून ग्राहक दागिने खरेदी करताहेत़ बाजारात उलाढाल वाढली आहे़ याहीपुढे आणखी वाढेल़ दागिन्यांच तुटवडा जाणवत आहे़ व्यापाºयांमध्ये समन्वयातून उपलब्ध करत असताना जिल्हाबंदीचा अडसर ठरतोय़ तो दूर व्हावा़ - गिरीश देवरमणी, अध्यक्ष, सराफ असोसिएशन