मोहोळ : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील संवैधानिक आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, मागासवर्गीय अधिकार्यांच्या न्याय हक्कांवर जाणीवपूर्वक गदा आणणारे मंत्रीगट समितीचे अध्यक्ष अजित पवार यांना पदावरून हटविण्याची मागणी ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लाॅईज फेडरेशन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार लीना खरात यांच्याकडे याविषयीचे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा असल्याने सदरचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. मागासवर्गीयांची पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के रिक्त पदे बिंदुनामावलीनुसार तत्काळ भरण्याचा आदेश जारी करावा, मुख्य सचिवांनी शासन निर्णयाचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर आरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी, पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी मुख्य सचिवांना वगळून मागासवर्गीय प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, विधी व न्याय विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील आरक्षणविरोधी अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाची व सरकारची दिशाभूल केल्याबद्दल संबंधितावर आरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करून तत्काळ त्यांची बदली करावी, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख पदांवर सर्व मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार काळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना, पुणेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कारंडे, जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत यादव, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष महादेव गवळी, आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---
फोटो २३ मोहोळ
ओळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार लीना खरात यांना निवेदन देण्यात आले.