सोलापूर - मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधासाठी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२१ पासून दादर-साईनगर शिर्डी-दादर विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असतील असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, ही गाडी दादर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवार रोजी रात्री ९.४५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी स्थानकावर पहाटे ३.४५ वाजता पोहचणार आहे. साईनगर शिर्डी- दादर विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस साईनगर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक मंगळवार, गुरूवार आणि रविवार रोजी रात्री १०.१५ वाजता सुटणार असून दादर स्थानकावर पहाटे ४.३० वाजता पोहाेचणार आहे. या गाडीला दोन ब्रेकयान, ५ जनरल, ७ स्लिपर, एसी थ्री टियर २, एसी टू टियर १ असे एकूण १७ कोचेस असणार आहेत. कोविड-१९ संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.