-मल्लिकार्जुन देशमुखे, मंगळवेढा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी जिल्हाभर जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे स्मरण करताना त्यांची सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याच्या भुईकोट किल्ल्यामध्ये २० भुईकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांची भेट झाल्याची ऐतिहासिक नोंद इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांच्या 'मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास' या पुस्तकात मिळाली आहे. या दिवशी ते मंगळवेढ्यात मुक्कामी असल्याची नोंद आहे.
सेनापती नेताजी पालकर यांनी १९ डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढ्याचा किल्ला जिंकत मराठा पराक्रमाची मोहोर उमटवली. किल्ला जिंकल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २० डिसेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजा जयसिंग यांनी मंगळवेढ्याच्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली, असे पुस्तकामध्ये म्हटले आहे.
विजापूर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याची पाहणी, सामरिक स्थितीचा आढावा तसेच पुढील लष्करी हालचालींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा येथे झाल्याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे मंगळवेढ्याचा किल्ला केवळ लष्करी ठाणे न राहता शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार ठरतो. शिवराय आणि मिर्झा राजा जयसिंग यांची ही ऐतिहासिक भेट मराठा-मुघल संबंधांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
विजापूर मोहिमेच्या वाटेवर घडलेली ही घटना मराठा इतिहासात स्वतंत्र स्थान राखून असून, आजही मंगळवेढा किल्ला त्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देत उभा आहे. या ऐतिहासिक नोंदीमुळे मंगळवेढ्यात प्रत्येक वर्षी शिव मुक्काम दिन देखील साजरा होतो.
मंगळवेढ्याच्या इतिहासात ब्रह्मपुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावरील या ठिकाणी सन १६९५ ते १६९९ या काळात मुघल सम्राट औरंगजेबाचा मुक्काम होता. याच काळात त्यांच्या कैदेत असलेल्या सकवारबाई व येसूबाई बाळ शाहूसह येथे वास्तव्यास होत्या, अशी ऐतिहासिक नोंद आहे.
'मंगळवेढ्याचा किल्ला आणि ब्रह्मपुरी ही स्थळे मराठा-मुघल इतिहासातील महत्त्वाची साक्ष आहेत. २० डिसेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा येथे झालेला मुक्काम आणि पुढे औरंगजेबाचा ब्रह्मपुरीतील दीर्घकालीन मुक्काम या घटना मंगळवेढ्याच्या ऐतिहासिक वजनाची जाणीव करून देतात. -गोपाळराव देशमुख, लेखक
ब्रह्मपुरीत राजे जगदेवराव जाधव यांची समाधीही असून, ती त्या काळातील राजकीय घडामोडींची साक्ष देते. शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या वारस राजांच्या वास्तव्यामुळे मंगळवेढ्याची भूमी मराठा इतिहासात गौरवशाली ठरली आहे. -प्रा. विनायक कलुबर्मे, मंगळवेढा
Web Summary : Chatrapati Shivaji Maharaj and Mirza Raje Jaysingh met at Mangalvedha fort in 1665. The fort holds historical significance, witnessing strategic discussions during the Bijapur campaign. It's a crucial landmark in Maratha-Mughal history.
Web Summary : 1665 में छत्रपति शिवाजी महाराज और मिर्ज़ा राजे जयसिंह की मुलाकात मंगलवेढ़ा किले में हुई। बीजापुर अभियान के दौरान किले का ऐतिहासिक महत्व है, जहाँ रणनीतिक चर्चाएँ हुईं। यह मराठा-मुगल इतिहास में एक महत्वपूर्ण स्थल है।