तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील धोत्री, खडकी ते सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत साडेपाच कि.मी.चा रस्ता नादुरुस्त झाल्याचे कारण दाखवत धोत्रीपर्यंत येणारी महापालिकेची सिटीबस बंद केल्याने विद्यार्थ्यांसह दोन गावच्या प्रवाशांचा शहराकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. अखेर खासगी जीपने विद्यार्थ्यांना शहराकडे जावे लागते.सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा धोत्री गावापर्यंत दररोज चालू होती. दिवसाकाठी सहा बसफेऱ्या होत असत. त्यामुळे खडकी, धोत्री येथील ५० महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांची सोय होत होती. परंतु,धोत्री ते सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत ५ कि.मी. रस्ता नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ही बससेवाच दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. सदरील रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय सोलापूरची बससेवा सुरु करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. कारण बाजारपेठ जवळ असल्याने या भागातील लोकांचा अधिक संपर्क सोलापूरशी आहे. दरम्यान, दुसरा पर्याय नसल्याने या भागातील प्रवाशांना खासगी जीपने प्रवास करावा लागत आहे. तरी बंद केलेली सिटीबस सेवा तात्काळ सुरु करावी, अशी मागणी खडकी व धोत्री ग्रामस्थांतून होत आहे. ------------------------------एसटी बस सुरू करातुळजापूर आगाराची मंगरुळ, नांदुरी, धोत्री, खडकी मार्गे तुळजापूर-सोलापूर ही बस नव्याने सुरु करावी व गावकरी, विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी धोत्रीच्या सरपंच अश्विनी शिवाजी साठे व खडकीचे ग्रा.पं. सदस्य सुनील नागणे यांनी केली आहे. दिवसाकाठी चार गाड्या सोडाव्यात नसता, एस.टी. सेवेअभावी गावकऱ्यांच्या समस्या कायम राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
खराब रस्त्यांमुळे बससेवा बंद
By admin | Updated: August 4, 2014 01:06 IST