करमाळा : सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावरील दीडशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळच्या पुलाचा भाग खचल्याने तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थांचा पुणे जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
उजनीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याच्या लाटाच्या माऱ्यामुळे हा पुल खचला आहे. पुल खचल्याने या भागातील नागरिकांचे दळणवळण बंद झाले आहे. आमदार नारायण पाटील यांना समजताच तातडीने त्यांनी पुलाची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱी उपस्थित होते. पुलावरील वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणेने बॅरिगेटिंग लावून व रस्त्यावर मोठी चारी खोदून बंद केली आहे. मागील काही दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने उजनी धरणात पाण्याची पातळी वाढली आहे.