सोलापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोलापूरकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. २७ मार्चनंतर तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहिला असून, शनिवार ११ एप्रिल रोजी सोलापूरचा पारा ४१.४° सेल्सिअस (१०६.५° फॅरनहाइट) या मोसमातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले असून, जणू काही 'आकाशातून आग' बरसत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
दरम्यान, सोलापुरात दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या काळात शहरात 'हॉट ओव्हन' सारखी स्थिती निर्माण होत आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या वर गेल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा कायम राहत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सोलापूरच्या भौगोलिक परिस्थितीमुळे एप्रिल आणि मे महिन्यात येथे तापमान वाढणे स्वाभाविक असले, तरी यंदा हे प्रमाण लवकर वाढले आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम सोलापूरच्या तापमानावर होईल असेही हवामान विभागाने सांगितले आहे. "सोलापूरकरांनी अनावश्यकरीत्या दुपारी घराबाहेर पडू नये. तापमानाचा पारा इथून पुढे वाढतच जाणार असल्याने आरोग्याला प्राधान्य द्यावे," असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
'उष्माघात' होण्याचा धोका सर्वाधिक
आरोग्य विभागाचा 'रेड अलर्ट': काय करावे आणि काय टाळावे? वाढत्या तापमानामुळे 'उष्माघात' होण्याचा धोका सर्वाधिक असतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येणे किंवा शुद्ध हरपण्याचे प्रकार घडू शकतात. दर अर्ध्या तासाला पाणी प्या. ओआरएस घरी बनवलेली लस्सी, तोरणा, लिंबू पाणी आणि ताकाचा वापर वाढवा. घराबाहेर पडताना डोके रुमालाने बांधा, छत्री वापरा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापरा असे आवाहन केले आहे.
Web Summary : Solapur experiences scorching heat, hitting 41.4°C. Hot conditions prevail, prompting health alerts for heatstroke. Residents advised to stay hydrated and avoid midday sun. Heatwave expected in nearby regions.
Web Summary : सोलापुर में भीषण गर्मी, तापमान 41.4 डिग्री सेल्सियस तक पहुंचा। लू की स्थिति, हीटस्ट्रोक के लिए स्वास्थ्य अलर्ट जारी। निवासियों को हाइड्रेटेड रहने और दोपहर की धूप से बचने की सलाह। आसपास के क्षेत्रों में लू चलने की संभावना।